South Actor Stranded In Dubai : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे तिथल्या विमानतळावर अनेक प्रवासी अडकले आहेत. सोनल चौहान, ईशा गुप्ता आणि विष्णू मंचू यांच्यासह अनेक भारतीय सिनेकलाकारही दुबईत अडकले आहेत.
अशातच अमेरिका-इराणच्या तणावादरम्यान साऊथ सुपरस्टार अजित कुमारही दुबईत अडकल्याची माहिती समोर आली आहे. अजित कुमार चेन्नईला परतणार होता, पण दुबई विमानतळावरुन सर्व उड्डाणं रद्द करण्यात असल्यामुळे अभिनेत्याला दुबईतच थांबावं लागलं आहे.
अजित कुमारला रेसिंगची खूप आवड आहे. तो फक्त एक छंद नाही तर, एक व्यवसाय म्हणूनही रेसिंग करतो. त्यानं २०२५ मधील 24H Dubai या शर्यतीतही उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच रेसमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता दुबई आणि अबू धाबीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेला. पण दुबईहून उड्डाणे बंद करण्यात आल्याने तो तिथे अडकला आहे. अभिनेत्याच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे.
अजित कुमारच्या मॅनेजरने दिली माहिती
१ मार्च रोजी अजितच्या मॅनेजरने अभिनेत्याच्या सुरक्षेबद्दल माहिती दिली. ‘झूम’शी बोलताना तो म्हणाला, “अजित भारतात येण्यासाठी निघाले होते, पण विमानतळावरूनच त्यांना परत यावे लागले. सध्या ते दुबईमध्ये सुरक्षित आहेत.” अजित सध्या सुरक्षित असून त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. हवाई सेवा सुरू झाल्यानंतर ते भारतात परततील, असंही मॅनेजरनं सांगितलं.
दरम्यान, सोशल मीडियावर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक प्रवासी पुढील माहितीसाठी प्रतीक्षा करताना दिसत आहेत. एअर इंडिया आणि इंडिगो यांनी सांगितले आहे की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू करतील.
अजित कुमारच्या कामाबद्दल थोडक्यात
अभिनेता अजित कुमारबद्दल सांगायचं झाल्यास, अभिनयाबरोबरच तो भारतात रेसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो फॉर्म्युला-1 आणि इतर मोठ्या मोटरस्पोर्ट्स स्पर्धांकडे लोकांचे लक्ष वेधत आहे. त्याच्या अभिनयातील कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो नुकताच Good Bad Ugly या चित्रपटात दिसला होता. दिग्दर्शक ए.एल. विजय यांच्याबरोबर रेसिंगच्या विषयावर आधारित एका विशेष प्रोजेक्टवर काम करत आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
