उषा नाडकर्णी आजही उतारवयातही तितक्याच फिट असून काम करत आहेत. त्यांच्या याच गोष्टीचं अनेक जण कौतुक करत असतात. अशताच आता त्यांनी त्यांच्या फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे. उषा यांनी त्यांच्या आहारात काय असतं, त्यांना काय खायला आवडतं या सगळ्याबद्दल सांगितलं आहे.

मराठी व हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या उषा नाडकर्णी या मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. विशेष करुण इतकी वर्षे काम केल्यानंतरही आजही त्या त्याच उत्साहाने काम करत आयुष्य जगत आहेत. कोणाचाही आधार न घेता त्या आजही स्वत:चं सगळं स्वत: करत आहे. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

उषा नाडकर्णी यांना आवडतं कोल्हापुरी जेवण

अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी सांगितलं की त्यांच्याकडे सारस्वत पद्धतीचं जेवण बनवलं जातं आणि त्यांना मांसाहार करायला खूप आवडतो. मासे, त्यापासून बनवलेले विविध पदार्थ खायला त्यांना खूप आवडतं असं त्यांनी सांगितलं आहे. पण, यावेळी त्यांनी त्यांना कोल्हापुरातलं जेवणही खूप आवडतं असं म्हटलं आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, “मासे वगैरेपेक्षा कोल्हापुरात जाते तेव्हा भाकरी, ठेचा त्यात दही घालायचं. मला निळू भाऊंनी (निळू फुले) सांगितलेलं की उषा ठेचा असाच नाही खायचा त्यात दही घालायचं म्हणजे त्यातला तिखटपणा कमी होतो. म्हणून मी आजही तसंच खाते. कारण जास्त तिखट खाल्लं तर पोटाला त्रास होतो.”

आवडत्या पदार्थांबद्दल उषा पुढे म्हणाल्या, “नाशिकला जाताना एक हॉटेल आहे तिथे भाकरी, भरली वांगी आणि ठेचा खाते. तिथे मी जातेच कारण मला मासे वगैरेपेक्षा भाकरी, पिठलं ठेचा आवडतो”. उषा यांनी पुढे शूटिंगला जाताना त्या सेटवर त्यांचा डबा घेऊन जातात आणि त्यांना एकट्याने खायला आवडतं असं सागंताना त्यांनी यामगाचं कारणही सांगितलं आहे.

असा असतो रोजचा आहार

उषा नाडकर्णी याबद्दल म्हणाल्या, “सगळे बसले की बडबड करतात आणि मला जेवताना बडबड आवडत नाही. शांतपणे जेवायचं. कारण अशावेळी तुम्ही जेवता तर मग त्याची चवसुद्धा तुम्हाला कळत नाही. ज्यासाठी आपण जगतो ते खाताना छान शांतपणे जेवलं पाहिजे. मी माझा डबा घेऊन जाते तो खाते ताकापासून सगळं नेते. कारण मला जेवल्यानंतर ताक लागतं. माझं असं नसतं की मला हे द्या, ते द्या”. रोजच्या जेवणात काय आवडतं असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “वरणभात. वेगवेगळ्या प्रकारचं वरण आमच्याकडे बनतं. एक गोड वरण, त्यानंतर डाळीचं तोय आणि डाळीसार”.