उषा नाडकर्णी मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. उषा नाडकर्णी अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी नुकतंच त्यांच्या खासगीआयुष्यातील काही गोष्टींबद्दल सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अनेकदा यासाठी त्या ट्रोलही होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांचं खासगी तसेच व्यावसायिक आयुष्य आणि ट्रोलिंग या सगळ्याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नानंतरच्या आठवणी सांगत सासरी गेल्यानंतर त्यांना स्वयंपाकातलं काहीच येत नव्हतं, तसेच त्यांच्या पती व मुलाबद्दलही सांगितलं आहे.
उषा नाडकर्णी यांनी या संवादारम्यान त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आवडी निवडींबद्दलही सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सारस्वत समाजातील खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताना त्यांच्याकडे कायम मासे मोठ्या प्रमाणात बनले जायचे, पण त्यांनी कधीही चिकन, मटन असा इतर मांसाहार केला नाही. मात्र लग्नानंतर पती व सासरच्या मंडळींसाठी त्यांनी हे सगळं केल्याचं म्हटलं आहे.
पतीबद्दल उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत उषा नाडकर्णी म्हणाल्या, “आमच्याकडे रवीवारी आईला शाळेला सुट्टी असली की ती मासे करायची पण कधीच चिकन वगैरे बनायचं नाही फार क्वचितच कधीतरी आम्ही ते खायचो. मी आजही ते घरी आणत नाही पण, माझं लग्न झाल्यानंतर मी एक दिवस माझ्या नवऱ्यासाठी चिकन बनवलं होतं पण त्यानंतर संपूर्ण दिवस मला त्रास झाला, मी ओकाऱ्या काढत होते. कारण त्याआधी कधीच असं काही केलं नव्हतं. मला कसं करतात हे माहीत होतं पण कधीच केलं नसल्याने मला त्रास झाला.पण मी बनवलेलं चिकन मस्त झालं होतं कारण त्यांची भाची, पुतणी सगळ्यांनी मी बनवलेल्या मांसाहारावर ताव मारलेला आहे. मला जमतं ते बनवायला.”
उषा नाडकर्णी यांनी सांगितल्या लग्नानंतरच्या जुन्या आठवणी
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, “सासरी नाही, आम्ही दोघेच राहत होतो. सगळ्यांबरोबर राहत नव्हतो. पण त्या सगळ्यांना मी जेवण बनवून खायला घातलं आहे. एकदा १४ जण होते त्यातले काही मांसाहार करणारे तर काही ते न खाणारे होते मग मी काहींसाठी बांगडे तळले होते आणि बाकीच्यांसाठी फ्लावरची भजी केली होती”. पण पुढे उषा यांना त्या स्वयंपाक करायला कशा शिकल्या असं विचारल्यानंतर त्यांनी “आईच्या घरी आईने मला कधीही तू हे कर असं म्हटलं नाही. मी आईच्या घरी चहासुद्धा केला नव्हता. आईने कधीच आमच्याकडून कामं करुन घेतली नाही.” उषा नाडकर्णी यांनी अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
उषा नाडकर्णी यांना पुढे अनेकदा मुलगी सासरी जाणार लग्नानंतर तिला सगळं आलं पाहिजे म्हणून मुलींना आधीच सगळं शिकण्याचा आग्रह करतात मग तुमच्याकडे असं नव्हतं का असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “कधीच नाही. लग्न झालं. लग्नानंतर तालमकेवाडीत राहायला गेले मी आणि मला काहीच येत नव्हतं. आमच्याखाली नंणद राहायची. तिच्याकडे जाऊन सगळं विचारायचे आणि वरु येऊन करायचे. असंच शिकले.”
