उषा नाडकर्णी यांनी आतापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. यानिमित्त अनेक दौरे आणि प्रयोग केले आहेत. अशातच त्यांनी एका नाटकादरम्यानचा किस्सा सांगितला आहे. या नाटकात अभिनेते नाना पाटेकरही होते. त्यावेळी त्यांच्या सेटवर जेवणाची सोय न झाल्याने सगळे भुकेले होते असं त्यांनी सांगितलं आहे.

उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनय प्रवासाबद्दल, कुटुंबाबद्दल,लग्नानंतरच्या आठवणी आणि खाण्याचे आवडते पदार्थ अशा सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी एका नाटकादरम्यान त्यांची जेवणाची गैरसोय झाली होती असं म्हटलं आहे. त्यावेळी मग त्यांनी काय केलेलं हे ही सांगितलं आहे.

उषा नाडकर्णींनी सांगितला किस्सा

उषा नाडकर्णी यांनी अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना नाटकांच्या दौऱ्यांदरम्यान घडलेल्या अविस्मर्णीय प्रसंगाबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “गोव्यामध्ये मजा यायची. पण, एकदा बेळगावला आमचा पुरुषचा प्रयोग होता आणि त्या काँट्रेक्टरने जेवणाची सोय केलीच नव्हती. सगळे वाट बघत होते पण जेवणच आलं नाही. नाटक संपल्यानंतर आम्ही वाट पाहत होतो. मग एका बाईला त्याने फोन केला तिने त्यावेळी जे पिठलं आणि भात आणला होता तो इतका चविष्ठ होता की आजही इतक्या वर्षांनंतरही मला ती चव आठवते. त्या नाटकात रिमा लागू, नाना पाटेकर होते.”

नाना पाटेकरांनी काय केलं?

उषा यांना पुढे जेवण न मिळाल्यानंतर नाना पाटेकर चिडले असतील असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या,” तो काय करणार?” जेवण वेळेत न आल्याने सगळ्यांना भूक लागली होती पण कोणी काही करू शकत नव्हतं असंही उषा यांनी पुढे सांगितलं. यावेळी त्यांनी मालिका, चित्रपटाच्या सेटवर मात्र त्या त्यांचा डबा घेऊन जातात आणि एकट्याने जेवतात असं सांगितलं आहे.

उषा यांनी यावेळी सगळ्यांबरोबर जेवायला बसल्यानंतर सगळे खूप बडबड करतात आणि जेवताना त्यांना बोलायला आवडत नाही असं सांगत म्हणून त्यांना एकट्याने जेवायला आवडतं असं म्हटलं. उषा यांनी या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यातील काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी यामधून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे त्यांना ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलं आहे.