उषा नाडकर्णी मनोरंजन विश्वातील असं नाव आहे जे फार क्वचित कोणाला माहीत नसेल. मराठीसह हिंदीतीलही नाटक, मालिका व चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक दिग्ग्ज कलाकारांबरोबरही स्क्रीन शेअर केली आहे. अशातच आता त्यांनी दिवंगत अभिनेते निळू फुलेंचा एक किस्सा सांगितला आहे.
निळू फुले हे मराठी सिनेसृष्ट्रीतील मोठं नाव आहे. एकेकाळी त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्यामुळे आजही ते हयात नसतानाही अनेक जण त्यांच्याबद्दल बोलताना त्यांचं कौतुक करतात. अशातच आता उषा नाडकर्णी यांनीसुद्धा त्यांचा एक किस्सा सांगितला आहे. अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या खाण्याच्या आवडींबद्दल सांगताना निळू फुलेंचा उल्लेख करत त्यांचा एक किस्सा सांगितला आहे.
उषा नाडकर्णींनी सांगितली निळू फुलेंची आठवण
मुलाखतीत उषा यांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील आवडत्या पदार्थांबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मला ना मासे वगैरेपेक्षा कोल्हापुरात जाते तेव्हा भाकरी ठेचा त्यात दही घालायचं हे आवडतं. मला निळू भाऊंनी सांगितलेलं की ठेचा उषा असाच नाही खायचा त्यात दही घालायंच म्हणजे त्यातला तिखटपणा कमी होतो. म्हणून मी आजही जेव्हा कुठेही जाते आणि ठेचा असेल तर सांगते की दही घालून द्या कारण ते पोटासाठी त्रासदायक असू शकते. पण दही घातल्यानंतर मला जास्त आवडतं”.
उषा नाडकर्णी यांनी याच मुलाखतीत नाना पाटेकरांचा एक किस्साही सांगितला आहे. त्यांना नाटकांच्या दौऱ्यांदरम्यान घडलेल्या अविस्मर्णीय प्रसंगाबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “गोव्यामध्ये मजा यायची. पण, एकदा बेळगावला आमचा पुरुषचा प्रयोग होता आणि त्या काँट्रेक्टरने जेवणाची सोय केलीच नव्हती. सगळे वाट बघत होते पण जेवणच आलं नाही. नाटक संपल्यानंतर आम्ही वाट पाहत होतो. मग एका बाईला त्याने फोन केला तिने त्यावेळी जे पिठलं आणि भात आणला होता तो इतका चविष्ठ होता की आजही इतक्या वर्षांनंतरही मला ती चव आठवते. त्या नाटकात रिमा लागू, नाना पाटेकर होते.”
नाना पाटेकरांनी काय केलं?
उषा यांना पुढे जेवण न मिळाल्यानंतर नाना पाटेकर चिडले असतील असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या,” तो काय करणार?” जेवण वेळेत न आल्याने सगळ्यांना भूक लागली होती पण कोणी काही करू शकत नव्हतं असंही उषा यांनी पुढे सांगितलं. यावेळी त्यांनी मालिका, चित्रपटाच्या सेटवर मात्र त्या त्यांचा डबा घेऊन जातात आणि एकट्याने जेवतात असं सांगितलं आहे.
