मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच मालिकाविश्वात आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत साकारलेली सविता देशमुख ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या कडक सासूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

मात्र, उषा नाडकर्णी यांचा अभिनयाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आर्थिक अडचणींपासून ते वैयक्तिक संघर्षांपर्यंत अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आयुष्यात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. तसेच, आजवर एकदाही जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला नसल्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.

जीवनगौरव पुरस्काराबद्दल काय म्हणाल्या उषा नाडकर्णी?

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी ‘लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार स्वीकारत नसल्यामागचं कारण सांगितलं. आपल्या अभिनय कारकिर्दीला अजूनही सुरुवातच झाली आहे, असं त्यांना वाटत असल्याने असा पुरस्कार स्वीकारण्याची त्यांची इच्छा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मी लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारही स्वीकारणार नाही. झीने अनेक लहान वयाच्या अभिनेत्रींचा सन्मान केला, पण मला दिला नाही. कारण त्यांनाही माहिती आहे की मी अजूनही काम करतच राहणार आहे. माझ्याकडे पुरस्कार ठेवायलाही जागा नाही. मी म्हातारी झालेली नाही, फक्त वय वाढलं आहे. मला अजूनही सातत्याने काम करायचं आहे.”

याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दलही भाष्य केलं. व्यावसायिक क्षेत्रातील अनेक गोष्टींची सखोल माहिती नसतानाही आजवर सर्व कामं स्वतःच सांभाळल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “माझ्या आई-वडिलांप्रमाणेच मी कधीच हिशोब ठेवला नाही. माझ्यासाठी व्यवस्थापन किंवा पीआर सांभाळण्यासाठीही कधी कोणाला ठेवलं नाही. माझा विश्वास फक्त मेहनतीवर आहे. ज्यांना माझ्याबरोबर काम करायचं असेल, ते माझ्यापर्यंत पोहोचतीलच.”

याच मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी चित्रपट आणि मालिकांच्या सेटवरील त्यांच्या साध्या राहणीमानाबद्दलही सांगितलं. आजवर आपण कधीच शूटिंगसाठी व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, एकदा त्यांना देण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनमधील एअर कंडिशनर बंद होता आणि दरवाज्याचं लॉकही नीट काम करत नव्हतं. मात्र, त्याबाबतही त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. सुरुवातीच्या काळाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, पूर्वी कलाकार शेडमध्ये किंवा टेम्पोमध्ये कपडे बदलायचे. तेव्हा कोणीही तक्रार करत नसे, कारण त्या काळातील कलाकार परिस्थितीशी जुळवून घेणारे होते.

७० व्या वर्षी घेतलं स्वतःचं पहिलं घर

उषा नाडकर्णी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी स्वतःचं पहिलं घर खरेदी केल्याचाही खुलासा केला. कर्ज घेण्याची भीती असल्यामुळे अनेक वर्षे घर खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी आधी घर का घेतलं नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला. पण मला कर्ज घेण्याची भीती वाटायची. माझं निधन झालं तर कर्ज ठेवून गेली असं लोक म्हणतील, अशी भीती होती. शिवाय, मी प्रामुख्याने मराठी इंडस्ट्रीत काम केलं, जिथे मानधन कमी मिळायचं. हिंदी मालिकांमध्ये काम केलं तरी अनेकदा मानधन फारसं नव्हतं. या क्षेत्रातील माझी पहिली कमाई अवघी २५ रुपये होती.”