मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत ‘खाष्ट सासू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे म्हणजे उषा नाडकर्णी. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्या घराघरांत प्रसिद्ध झाल्या. बिनधास्त मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या मराठीसह हिंदीतील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमधील आपल्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेही तितक्याच चर्चेत येत असतात.

अशातच त्यांनी “मराठीत कौतुक नाही जळकुटेपणा खूप आहे”, “एक चित्रपट केला तर स्वत:ला मोठे हॉलीवूडचे समजायला लागतात” अशी वक्तव्ये केली आहेत. लोकमत फिल्मीबरोबरच्या संवादात त्यांनी असं म्हटलं, “मराठीमध्ये काही ठिकाणचं वातावरण बघून असं वाटतं की नको. आपण आपलं काम करू आणि संपलं म्हटलं की घरी जाऊ. हिंदीत प्रेम खूप करतात आणि कौतुकही होतं. आपल्या मराठीत कौतुक नाही जळकुटेपणा खूप आहे.”

यापुढे त्या म्हणाल्या, “मला एका निर्माती बाईंचा फोन आला होता, तेव्हा मला त्या म्हणाल्या, ‘उषा तू खूप छान काम करत आहेस. पण मी बघितलं तिकडे हिंदीत तुला खूपच प्रेम करतात. मग मराठीत का नाही?’ यावर मी त्यांना असं म्हटलेलं की, ‘मराठीत सगळ्यांची जळते. आम्ही हिच्याबद्दल इतकं बोलूनही हिला कामं कशी मिळतात.’ माझ्याकडे कोणाचे नंबर्स नाहीत. मला कोणाला फोन करून काम दे असं म्हणायचं नाही. आजपर्यंत उषा ही आहे ती तिच्या कामामुळे आहे.”

मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी
मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी

यानंतर उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मला कामासाठी इतर काही करावं लागलं नाही किंवा कुणाला मस्का लावावा लागला नाही. जर कोण समजत असेल की, आम्ही हिला काम देत आहोत तर सॉरी, असं काही नाही. आता सुद्धा कोणाची कामे आली आणि माझे पैसे जर मला मिळणार नसतील तर मी सांगते, दुसरी कोणी बघा. मी बरं काम करते, टाकाऊ काम करत नाही. त्यामुळे वयाच्या ८९ वर्षीही काम करत आहे. मला काम करायला आवडतं. काम करत असताना मला मरण आलं पाहिजे.”

यांतर उषा नाडकर्णींनी बॉलीवूड कलाकारांचं कौतुक करत म्हटलं, “जॅकी श्रॉफ चांगला आहे. तो मला ‘डार्लिंग हाय’ अशी हाक मारतो. अक्षयबरोबर मी ‘रुस्तम’ चित्रपटात होती. तोही खूप छान आहे. त्याने मोबाइलवर मला घरचे फोटो दाखवले. अक्षय हा मला आपल्यातला वाटतो. भारती सिंहसुद्धा खूप आवडती आहे. ते नवरा-बायको दोघेही खूप चांगले आहेत. काही माणसं खरंच खूप चांगली आहेत, ज्यांना मोठेपणा शिवलेला नाही. नाही तर आमच्या मराठीत… छोटीशी एन्ट्री घेतली नाही तरी सगळे स्वत:ला अमिताभ बच्चनचे बाप असतात. त्यामुळे बोलायला जायचंच नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे उषा नाडकर्णी विजय सेतुपतीचं कौतुक करत म्हणाल्या, “त्याच्याइतका गरीब माणूस मी बघितला नाही. आम्ही ज्या घरांत शूटिंग करत होतो. तिथे बसायला त्याने कधीच खुर्ची मागितली नाही. तो आमच्याबरोबर जमिनीवर मांडी घालून बसायचा. हे आपल्याकडच्या मराठी लोकांनी शिकायला पाहिजे. संघर्ष करून इथवर आल्याबद्दल त्यांना याची जाणीव आहे. आपल्याकडे गर्वाने मरणारी माणसं आहेत. एक चित्रपट केला तर स्वत:ला मोठे हॉलीवूडचे समजायला लागतात.”