उषा नाडकर्णी या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या खूप कठोर स्वभावाच्या आहेत किंवा कडक शिस्तीच्या आहेत असंही म्हटलं जातं. पण त्यांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जिच्यासाठी त्या अजिबात कठोर नाहीये, किंबहुना तिचा सगळा त्रास त्या तिच्या प्रेमापोटी सहन करतात. ही व्यक्ती म्हणजे त्यांची नात.

उषा नाडकर्णी यांना एक मुलगा असून तो त्यांना प्रेमाने आऊ अशी हाक मारतो. याबद्दल त्यांनी ‘बिग बॉस’मध्ये असताना सांगितलं होतं. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल, लग्ननंतरच्या आठवणी आणि नातीबद्दल पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याबद्दल सांगितलं आहे. तर त्यांच्या नातीबरोबर त्यांचं नातं कसं आहे याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे.

नातीबद्दल काय म्हणाल्या उषा नाडकर्णी

अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना नातीला तुमच्या हातचं काय आवडतं असं विचारल्यानंतर त्या गंमतीत म्हणाल्या, “तिला काय आवडतं, फक्त मी झोपलेली असले की येऊन पाठून मारुन जाते”. पुढे नातीला मांसाहार आवडत नाही का, सारस्वत आहे म्हटल्यावर आवडत असेल ना असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “अंडं आवडतं तिला. चिकन आवडतं. लहान आहे अजून. माझ्या नातीला चपाती आवडतो”.

यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या हातचं कोळंबीचं लोणचं आवडतं असं सांगितलं आहे. लेकाबद्दल उषा नाडकर्णी म्हणाल्या, “त्याला मांसाहार जास्त आवडतं. भावाच्या बायकोने एकदा कोळंबीचं लोणचं बनवलं होतं. त्याने ते खाल्लं पण त्याला ती चव आवडली नाही. मला म्हणाला तू येऊन करुन दे. मग मी दिलं करुन. त्यानंतर त्याने मला मॅसेज केला मला म्हणाला, म्हातारीची आठवण आली. म्हातारी म्हणजे माझी आई”.पुढे त्यांना तो जेवायला येतो तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काय खास बनवता असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, तो जेवायला येतंच नाही”.

दरम्यान, उषा नाडकर्णी यांनी या मुलाखतीत त्यांच्या लग्नानंतरच्या आठवणी, सासरची मंडळी, पती आणि एकंदरीतच खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्या स्वयंपाक करायला कशा शिकल्या आणि खाण्याच्या आवडींबद्दलही सांगितला आहे.