‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ठाकुर सज्जन सिंह ही भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते अनुपम श्याम यांचं रविवारी निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. किडनी संबंधित काही समस्या असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.अतिदक्षता विभागात गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचारांनंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचं निधन झालं.

अनुपम श्याम यांनी मालिकांसोबतच अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं. मात्र ‘प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे ते घराघरात पोहचले. उपचारा दरम्यान अनुपम यांना अनेक कलाकारांनी आर्थिक मदत देखील केली होती. एवढचं नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अनुपम यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती.

अनुपम यांना किडनीच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारांवर मोठा खर्च होत होता. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपम श्याम यांच्या उपचारांसाठी २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.यासोबतच अनुपम श्याम यांच्या कुटुंबियांनी सलमान खानच्या बींग ह्यूमन फाउंडेशनकडे देखील मदतीची याचना केली होती. त्याचसोबत त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्यासाठी अभिनेता मनोज वायपेयीने देखील त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनोज वायपेयीसोबतच अनुपम श्याम यांनी ‘सत्या’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

गेल्या वर्षी अनुपम यांचे भाऊ अनुराग यांनी आर्थिक परिस्थितीमुळे अनुपम यांच्यावर उपचार करणं कठिण जात असल्याची माहिती दिली होती.

अनुपम यांनी ‘लिटिल बुद्धा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर शेखर कपूर यांच्या ”बॅडिंट क्वीन’ या सिनेमाची त्यांना ऑफर मिळाली. ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘द वॉरियर’, ‘थ्रेड’, ‘शक्ति’, ‘हल्ला बोल’, ‘रक्तचरित’ अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. असं असलं तरी अनुपम यांनी खरी ओळख छोट्या पडद्यामुळे मिळाली. ‘मन की आवाज प्रतिज्ञा’, ‘कृष्णा चली लंदन’ आणि ‘डोली अरमानों की’ या मालिकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.