रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका या तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव मांगले यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यावेळच्या काही आठवणींना वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमधून उजाळा देत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय काही आठवणीही त्यांनी या पोस्टमधून शेअर केल्या आहेत. वैभव मांगले आणि विक्रम गोखले यांनी ‘आप्पा आणि बाप्पा’ या नाटकात एकत्र काम केलं होतं. अशात आता वैभव मांगले यांची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- “सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत

वैभव मांगले यांची पोस्ट-

“विक्रम काका… आता तू घेतलेला कधी ही न संपणारा पॉज. तुझ्या सोबत विशेष काम करायला नाही मिळालं. एकच नाटक, तुझं आणि दिलीप काकांचं ‘आप्पा आणि बाप्पा’ आणि आमचं नाटक ‘इथं हवंय कुणाला प्रेम ‘अमेरिकेत नेलं होतं सुधीर भट आणि गोपाळ अलगेरींनी. तेव्हा तुझ्या सोबत काम करण्याचा प्रसंग आला. आप्पा बाप्पा मध्ये एक छोटीशी एन्ट्री होती आणि त्या नाटकांसाठी मी तुला आणि दिलीप काकाना मेकअप करायचो आणि तुमचे कपडे पण मीच पाहायचो. (त्यावेळी खूप लोक घेऊन परवडायचे नाही म्हणून सगळे नट एकमेकांच्या नाटकांना मदत करायचे) तुमचे विग ही मी लावायचो. तेव्हा किती सांभाळून घेतलं होतंस. तू अद्वितीय नट होतास. लहानपणापासून तुझी नाटक पहिली आहेत. मुंबईत आल्यावर ‘नकळत सारे घडले ‘हे नाटक पाहिलं आणि मी वेडा झालो. डॉ. लागू आणि तू असे नट आहात की ज्यांना रंगमंचाचा अवकाश कवेत घेता येतो. रंग मंचावर जी काही नटाची आयुध असतात त्यांचा अतिशय उत्तम वापर तुम्हाला करता येतो. तुम्ही ते वातावरण भरून टाकता. तुझ्या पॉजबद्दल काय बोलावं… कुमारजी गाताना सुरांची आस सोडून द्यायचे… त्या सूरांच्या पुढचे सूरही ऐकू यायचे… तसा होता तुझा पॉज. शाहिद परवेज भाई सतारीवर मींड घेऊन ती आस खोल वर दाबून धरतात आणि मग त्या पॉज मधून एका वेगळ्या सुरांच्या दुनियेत नेऊन आणतात… अगदी तसं तुझ्या पॉज मध्ये व्हायचं… वाटायचं बोल आता जीव घुटमळला माझा… नाही झेपत… तुझं हे काहीही न बोलता फक्त चेहेऱ्या वरच्या रेषांनी डोळ्यांनी जे बोलू पाहतोयस ते झेपण्याच्या पलीकडे असायचं… ते कळायचं पण पाहणारा कासावीस व्हायचा. तू रडायचास पण कधी तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं तुझ्या. मी एकदा तुला विचारलं होतं तर तू म्हणालास… मांगल्या रडणं नरड्यात असतं. आवंढा येतो तेवढंच रडायचं. एरवी रडणं सोपं असतं. नट रडतो पण प्रेक्षक नाही रडतं… नटाला आवंढा काढताना पाहून रसिकांच्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. नटाने डोळ्यात पाणी न आणण्याचं कसब मिळवलं पाहिजे. तोच प्रयत्न मी ‘संज्या छाया’ या नाटकात करतो… काल तुझी बातमी कळली आणि खरंच नाटकात आवंढा आला. एक दोन वाक्य तुझ्या स्टाइलने घेऊन टाकली. तुला श्रद्धांजली म्हणून. खूप दिलंस मला नट म्हणून…”

आणखी वाचा- “अगदी २५- ३० दिवसांपूर्वी भेट झाली…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

दरम्यान विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर अभिनयाबरोबरच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं होतं. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav mangle share memories in his instagram post after vikram gokhale death mrj
First published on: 27-11-2022 at 13:01 IST