प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन देण्याचा विडा झी टॉकीजने दरवर्षी प्रमाणे उचलला आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे एक विशेष चित्रपट ‘वाजवुया बँड बाजा’. येत्या रविवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर संदीप नाईक यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई आणि समीर धर्माधिकारी यांनी या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नागेश भोसले, अभिजित चव्हाण, कांचन पगारे यांच्या विशेष लक्षवेधी भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे अनुभवायला मिळणार आहेत. विजय गटलेवार यांनी या सिनेमाला संगीत दिले असुन आदर्श शिंदे यांच्या खड्या आवाजातील गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

समीर धर्माधिकारी यांनी वठवलेला संदीप हा एक शिक्षक आहे. समाजात चांगले विद्यार्थी घडवणं हे आपलं आद्य कर्तव्य मानणाऱ्या संदीपच्या आयुष्यात आई आणि आपल्या बालमैत्रिणी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रियांना प्रवेश नाही. तर मंगेश देसाईंनी साकारलेला अमित हा गावातला एकुलता एक कंपाउंडर कम डॉक्टर आहे. ज्या डॉक्टरकडे अमित प्रॅक्टिस करत आहे, त्याच डॉक्टरच्या मुलीच्या प्रेमात तो घायाळ झाला आहे. संदीप आपल्या बालमैत्रिणीसमोर आपल्या प्रेमाची ग्वाही देतो का? अमितच्या प्रेमाची साक्ष डॉक्टरच्या मुलीला पटते का? पर्यायने संदीप आणि अमित या दोघा भावांचे प्रेम यशस्वी होते का? या प्रश्नांची मजेशीर उकल पाहण्याकरीता तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागणार आहे.