बंकिमचंद्रांच्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताची १५० वी वर्षपूर्ती सध्या साजरी केली जात आहे. अर्थात त्याच्यात समाविष्ट काही पंक्तींवरून वादंगही माजवण्याचा प्रयत्न झाला. तथापि आता त्यासंबंधीचा एक कायदाही संमत करण्यात आलेला आहे. (खरं तर एखाद्या राष्ट्रगीताच्या सन्मानासंबंधात कायदा करावा लागणं हीच मुळी नामुष्कीची गोष्ट आहे. त्याबद्दलचा आदर मुळातच जनमानसात असणं हीच आदर्श स्थिती होय. तर ते असो.) नुकतंच संगीत नाटक अकादमीने केंद्रीय सांस्कृतिक खाते आणि राज्यांतील सांस्कृतिक खात्यांच्या सहयोगाने एक राष्ट्रीय नाट्यमहोत्सव आयोजित करून ‘वंदे मातरम्’चा हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव मोठ्या गाजावाज्यात साजरा केला. त्यास महाकवी कालिदास जयंतीच्या औचित्याचीही जोड देण्यात आली होती. देशभरात ३९ भाषांतून १५० रंगाविष्कार एकाच वेळी याअंतर्गत सादर केले गेले. महाराष्ट्रात ‘नाट्यशाला’ या विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ४५ वर्षे सर्वस्वानं कार्य करत असलेल्या संस्थेस यानिमित्तानं रंगाविष्कार सादर करण्याची संधी मिळाली. त्यांनी रोटरी संस्कारधाम ॲकॅडमी (गोरेगाव)मधील कर्णबधीर मुलांच्या सहभागाने ‘नमो भारतम्… वंदे मातरम्’ हा हृदयस्पर्शी रंगाविष्कार सादर केला. त्याचं दिग्दर्शन केलं होतं- भरत मोरे यांनी. संकल्पना ‘नाट्यशाला’च्या संचालिका कांचन सोनटक्के यांची होती. या रंगाविष्काराचा विषय होता – भारताचा स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर भारत.

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्याच्या उठावापासून सुरुवात करून पुढे झाशीच्या राणीने ब्रिटिशांशी दिलेला लढा, टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेला स्वातंत्र्यसंग्राम, बंकिमचंद्रांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत लिहून या लढ्याला दिलेली स्फूर्ती, प्रत्यक्ष मिळालेलं स्वातंत्र्य, त्यानंतरची भारताची प्रगती आणि भारतीयांची राष्ट्राप्रतीची दायित्वं या सगळ्याचा परामर्श या रंगाविष्कारात प्रत्ययकारीतेनं घेतला गेला होता. त्यासाठी संवाद, निवेदन, सुंंदर नृत्यरचना, सामूहिक मोहक आकृतिबंध, जोशपूर्ण नाट्यरचना अशी सगळी आयुधं वापरण्यात आली होती. कर्णबधीर असूनही यातील सगळ्याच कलाकारांनी या रंगाविष्कारात दाखवलेला हुन्नर, समयोचितता कौतुकास्पद होती. त्यांच्या हालचाली, व्यवहार, सामूहिक कृती यांच्यातला एकमेळ लक्षवेधी होता. त्यांच्यातील शारीर त्रुटींचा, वैगुण्याचा कुठंही हासभास त्यात जाणवला नाही. उलट, प्रचंंड उत्साह, एकजिनसीपणा आणि ‘आम्ही हे करून दाखवूच’ची जिद्द त्यात होती. सर्वसामान्य (नॉर्मल) मुलांच्या ताकदीनं त्यांनी हा आविष्कार घडवला. याकामी संकल्पनाकार कांचनताई सोनटक्के यांची यामागचं नाट्य हेरण्यातील कल्पकता जाणवते. दिग्दर्शक भरत मोरे यांनी अवघ्या १५ दिवसांत या विशेष मुलांच्या तालमी घेऊन हा प्रयोग बसवला होता, हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. त्यातही त्यांनी नाट्यरचनेची रेखीवता, एकतानता, आकृतिबंधांचे नेत्रदीपक मनोरे आणि त्यातील आशय पोहोचवण्याचं उत्तम कौशल्य दाखवलं.

२८ कलाकारांचा मोठ्ठा समूह हाताळताना त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, गोंधळ-गडबड होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली होती. कर्णबधीर मुलांकडून हा रंगाविष्कार बसवून घेताना त्यांना किती कष्ट पडले असतील याची जाणीव होते. यात अनेक गाणी पेरलेली होती. त्यांच्या संगीताची बाजू सांभाळली होती- अनिकेत भोईर यांनी. योगिता तांबे, तेजल व्यास आणि देवीदास पालवे यांनी ही गाणी गायली होती. वेशभूषा लता नायक आणि मा. गौरांग शर्मा यांनी केली होती. पांढर्‍याशुभ्र पोशाखांतील सगळे कलाकार शुचिर्भूततेचं प्रतीक वाटत होते. रंंगभूूषेची जबाबदारी निशा गायकवाड आणि मा. पार्थ कौशिक यांनी सांभाळली होती. अरुण मडकईकर यांनी प्रकाशयोजनेद्वारे या रंगाविष्कारात उत्तम रंग भरले.

या रंगाविष्कारात संगीताचा कान आणि भान असलेल्या बिपीन वर्तक यांनी निवेदक-संवादकाची प्रमुख भूमिका यथातथ्यपणे निभावली. त्यांच्यासोबत रोटरी संस्कारधाम अकॅडमी (गोरेगाव) शाळेचे कसलेले २७ कलाकार तितक्याच जोश, होश आणि उत्कटतेनं सामील झाले होते. सर्वसामान्य (नॉर्मल) मुलं काय करतील, इतक्या सफाईनं आणि कौशल्यानं त्यांचा रंगमंचावरचा वावर होता. कर्णबधीर असूनही कुठंही गाण्यांत चुकीचं लीप सिंकिंग नव्हतं. या त्यांच्या तयारीला हॅट्स ऑफ!

एक प्रत्ययकारी रंगाविष्कार पाहिल्याचं समाधान उपस्थितांना मिळालं यात काहीच शंका नाही.