‘कॅप्टन अमेरिका’साठी वरुण धवनचा आवाज वापरल्याबद्दल चाहत्यांची जाहीर नाराजी
अॅनिमेशनपटांसाठी प्रसिद्ध चित्रपट कलाकारांचे आवाज वापरणे हा हॉलीवूडमध्ये रूढ प्रघात आहे. या प्रसिद्ध हॉलीवूड अॅनिमेशनपटांसह सुपरहिरो पटांनाही आपल्याकडे जास्त मागणी आहे हे लक्षात आल्यानंतर इथेही अशा प्रकारे कलाकारांचे आवाज वापरण्याचा उद्योग निर्मात्यांनी सुरू केला आहे. मात्र बॉलीवूड कलाकारांआधी प्रेक्षकांपर्यंत या सुपरहिरो व्यक्तिरेखा आपल्या भाषेत पोहोचवण्याचे काम इथल्या डबिंग आर्टिस्टनी केले होते. त्यांचे आवाज प्रेक्षकांमध्ये इतके लोकप्रिय आहेत की सरसकट सगळ्या व्यक्तिरेखांना बॉलीवूड कलाकारांचे आवाज देण्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
या एप्रिल महिन्यात ‘डिस्ने’चा ‘द जंगल बुक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध असलेल्या शेरखानसह बघिरा, बल्लू, का अशा पात्रांसाठी नाना पाटेकर, इरफान खान, प्रियांका चोप्रा, ओम पुरीसारख्या नावाजलेल्या कलाकारांचे आवाज वापरण्यात आले. मात्र आपल्याकडे जेव्हा ‘जंगल बुक’ हे अॅनिमेटेड मालिका स्वरूपात आले तेव्हाही शेरखानला नाना पाटेकर यांचाच आवाज होता. त्यामुळे नानांसह इतर कलाकारांचे आवाज या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी वापरण्याची ही मात्रा या चित्रपटाला लागू पडली. म्हणूनच सध्या इथे प्रदर्शित होणाऱ्या हॉलीवूडपटांच्या हिंदी आवृत्तीसाठी बॉलीवूड कलाकारांचेच आवाज वापरण्याचा फंडा निर्माते, वितरकांनी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हील वॉर’ या चित्रपटातील ‘कॅप्टन अमेरिका’ या सुपरहिरोला अभिनेता वरुण धवनचा आवाज देण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे डब चित्रपटांसाठी बॉलीवूड कलाकारांच्या आवाजाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत प्रेक्षकांनी मूळ डबिंग आर्टिस्टला पाठिंबा दिला आहे.

संकेत म्हात्रेच्या आवाजाचे गारूड
आत्तापर्यंत माव्र्हलपटांमधून ‘कॅप्टन अमेरिका’ ही व्यक्तिरेखा अनेक वेळा हिंदीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. त्यावेळी क्रिस इव्हानने साकारलेल्या या भूमिकेसाठी संकेत म्हात्रे या तरुण डबिंग आर्टिस्टने आवाज दिला होता. संकेतच्या आवाजाचे प्रेक्षकांवर इतके गारूड आहे की वरुण धवनचे या चित्रपटासाठीचे हिंदी संवाद ऐकल्यानंतर अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. डबिंग किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून संकेत म्हात्रेने २०११ साली आलेल्या ‘कॅ प्टन अमेरिका : द फर्स्ट अॅव्हेंजर’ या चित्रपटापासून ते ‘द अॅव्हेंजर्स’, ‘कॅप्टन अमेरिका : विंटर सोल्जर’, ‘अॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’ या चारही चित्रपटांमध्ये कॅप्टन अमेरिकासाठी संकेतने आवाज दिला होता. त्यामुळे आगामी ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हील वॉर’मध्ये वरुण धवनचा आवाज वापरला आहे हे ऐकल्यानंतर अनेक चाहत्यांनी समाजमाध्यमांमधून टीकेची झोड उठवली आहे. संकेत म्हात्रेसारखा उत्तम कलाकार असताना माव्र्हलसारख्या स्टुडिओने वरुण धवनचा आग्रह का धरावा इथपासून ते आम्हाला संकेत म्हात्रेच्याच आवाजात ‘कॅ प्टन अमेरिका’चे संवाद हवे आहेत, अशी मागणीही या चाहत्यांनी केली आहे.