बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली असून कंगनावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ सालामध्ये मिळालं आहे या कंगनाच्या वक्तव्यार बॉलिवूड सेलिब्रिटीसंह अनेक नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

कंगनाने नुकतीच टाइम्स नाऊच्या एका समिटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहित होतं. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवं. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळालं ते २०१४ सालामध्ये मिळालं” असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर सडकून टीका होत आहे.

“…ये रिश्ता क्या कहलाता है”, कंगनाला पद्मश्री मिळाल्यानंतर सोनू सूदचे चाहते संतापले

भाजप खासदार वरुण गांधींनी कंगानाचा व्हिडीओ शेअर करत “या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा सवाल उपस्थित केला आहे. वरुण गांधीनी एक ट्वीट केलंय. यात ते म्हणाले, “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?” असा सवाल उपस्थित करत वरुण गांधींनी कंगानाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

तर आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्करने देखील कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “त्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारे मूर्ख कोण आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे..” असं ट्वीट स्वराने केलंय.

तर अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरकेने देखील कंगनावर निशाणा साधला आहे. एक ट्वीट करत केआरकेने कंगनाला मूर्ख म्हंटलं आहे. कंगनाचं हे वक्तव्य ऐकून भगतसिंग, उधम सिंग स्वर्गात रडत असतील असं तो म्हणाला आहे.

वादग्रस्त वक्तव्य करण्याची कंगनाची ही पहिली वेळ नव्हे या आधीदेखील कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत ज्यामुळे तिला ट्रोल केलं गेलंय. एवढचं नव्हे तर सतत वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीट केल्याने कंगनाचं ट्विटर अकाउंटही बंद करण्यात आलं आहे.