एका अभिनेत्रीला अभिनयाची आवडही नव्हती आणि तिला इंडस्ट्रीत यायचं नव्हतं. पण ती अभिनेत्री झाली. १० वर्षांत तिने काही चित्रपट केले आणि इंडस्ट्री सोडली. मात्र या इंडस्ट्रीत काम करताना जे अनुभव तिला आले, त्याचा फायदा होईल असंच करिअर तिने पुढे निवडलं. विशेष म्हणजे आता कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या पदावर काम करतेय.
दीक्षा सेठचा अभिनेत्री होण्याचा कोणताही विचार नव्हता. तिचे वडील कॉर्पोरेट क्षेत्रात होते. त्यांच्या बदल्यांमुळे दीक्षाचे बालपण चेन्नई, मुंबई, कोलकाता, काठमांडू, राजस्थान आणि गुजरात अशा अनेक ठिकाणी गेले. सतत शाळा बदलत राहिल्यामुळे तिला कोणत्याही एका ठिकाणी स्थिरावण्याची सवय नव्हती. मुंबईत कॉलेजमध्ये असताना तिने ‘मरीन आर्किओलॉजी’ (सागरी पुरातत्वशास्त्र) शिकायचं ठरवलं होतं. समुद्राच्या तळाशी असलेले अवशेष आणि बुडालेल्या जहाजांचा इतिहास शोधणे, हे दीक्षा सेठचे ध्येय होते.
दीक्षा कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना एका ‘एनएसएस’ (NSS) कार्यक्रमादरम्यान एका स्काऊटने तिला पाहिलं. त्याने तिला ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं. दीक्षा त्या स्पर्धेत सहभागी झाली आणि ती टॉप १० स्पर्धकांमध्ये पोहोचली. तिने ‘फ्रेश फेस’ हा किताबही जिंकला.
दीक्षा सेठला चित्रपटात मिळाली संधी
दीक्षा हैदराबादमध्ये एका मॉडेलिंगच्या कामासाठी गेली होती. तिथे दिग्दर्शक क्रिशने तिला पाहिलं. त्यावेळी तो आगामी चित्रपटासाठी एक अभिनेत्री शोधत होता. तो चित्रपट होता ‘वेदम’. या भूमिकेसाठी तब्बल ७० मुलींचे ऑडिशन झाले होते, पण शेवटी दीक्षाची निवड झाली. ‘वेदम’ या गाजलेल्या चित्रपटात तिने अल्लू अर्जुनची गर्लफ्रेंड पूजाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट समीक्षकांना खूप आवडला होता. दीक्षाला या भूमिकेसाठी त्या वर्षीचा ‘संतोषम फिल्म अवॉर्ड्स’चा ‘बेस्ट न्यू फेस’ पुरस्कार मिळाला होता.
दीक्षा सेठचे चित्रपट
‘वेदम’च्या यशानंतर दीक्षाला एकामागून एक अनेक चित्रपट मिळाले. २०११ मधील मिरपाकय या सिनेमात दीक्षाने रवी तेजाबरोबर काम केलं होतं. त्याचवर्षी तिने वॉन्टेड सिनेमात काम केलं. हा चित्रपटही खूप गाजला होता. २०१२ मध्ये ती अनेक मोठ्या चित्रपटांत झळकली. यात रवी तेजाबरोबरचा ‘निप्पू’, प्रभास आणि तमन्ना भाटियाबरोबरचा ‘रेबेल’ आणि ‘ऊ कोदथारा? उलिकी पदथारा?’ या चित्रपटांचा समावेश आहे. दीक्षाने नंतर तमिळ सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. तिने विक्रमबरोबर ‘राजपट्टई’ या चित्रपटात काम केलं होतं.
दीक्षा सेठने लेकर हम दिवाना दिल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात तिने अरमान जैनबरोबर काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. या चित्रपटानंतर ती हळुहळू अभिनयापासून दूर गेली. शेवटची ती २०२१ मध्ये ‘सात कदम’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
दीक्षा सेठचे करिअर
दीक्षाने तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर दिलेल्या माहितीनुसार, तिने १० वर्षांत तेलुगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड अशा ४ भाषांमध्ये १० चित्रपटांत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. या १० चित्रपटांनी मिळून जगभरात ४५ मिलिय डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. दीक्षाने मीरा शाम्पू आणि आरएस ब्रदर्ससारख्या ब्रँड्ससाठी काम केलं. तिने ४५० पेक्षा जास्त टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रमांत सहभाग घेतला. तिने ३५० हून अधिक मुलाखती दिल्या. सोशल मीडियावर तिचे १० लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.
दीक्षा सेठ आता काय करते?
चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर दीक्षाने वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. दीक्षा सेठने तिने ‘IESE बिझनेस स्कूल’ मधून तिचे एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं. सध्या ती ब्रिटन (UK) येथील एका गेमिंग कंपनीत ‘डिरेक्टर ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स’ म्हणून कार्यरत आहे. इंडस्ट्री सोडून या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचं दीक्षा सेठ सांगते. माध्यमं, प्रेक्षक आणि ब्रँड्सबरोबर काम करण्याच्या १० वर्षांच्या अनुभवाचा वापर आता दीक्षा व्यावसायिक क्षेत्रात करत आहे
