बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिनेश हिंगू यांचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो पाहून ८६ वर्षीय दिनेश हिंगू आर्थिक अडचणीत असल्याचा दावा केला जात होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना त्यांची काळजी वाटू लागली. अमिताभ बच्चन, राकेश रोशन आणि बोनी कपूर यांसारख्या दिग्गजांनी मदतीसाठी हात पुढे केला. आता यावर दिनेश हिंगू यांच्या पत्नी जमुनाबेन हिंगू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या पतीच्या परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं त्यांनी स्पष्ट केलं. दिनेश आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्थिर आहेत आणि त्यांना कोणतीही अडचण नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दिनेश हिंगू यांचा व्हायरल व्हिडीओ साधारण दोन महिने जुना आहे, असं म्हटलं जातंय. त्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं की वयाच्या ८६ व्या वर्षीही त्यांना काम करावं लागतंय, कारण डॉक्टरांच्या उपचारासाठी पैसे लागतात. काम मिळतं, पण जास्त पैसे मिळत नाही कारण ‘कॅरेक्टर आर्टिस्ट’ला कोणी जास्त मानधन देत नाही. याच व्हिडीओमुळे ते आर्थिक संकटात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
“आम्ही सुखी आहोत, लोकांना गैरसमज झालाय”
चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सदस्य आणि पारस पब्लिसिटीचे राजेश वसाणी यांनी दिनेश हिंगू यांच्या कुटुंबाशी बोलल्यानंतर हे दावे फेटाळले. “मी अरुणा इराणी यांच्या माध्यमातून सौ. जमुना दिनेश हिंगू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संगितलं की त्यांचं कुटुंब सुखी आहे. त्यांना दोन मुलं आणि नातवंडे आहेत. दिनेश भाई अगदी ठीक आहेत. काहीतरी गैरसमज झालाय, असं वाटतंय. प्रत्येकाने व्यक्त केलेली काळजी आणि दिनेश भाईंच्या कामाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत,” असं वसाणी यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं.
मदतीसाठी सरसावले अमिताभ बच्चन, राकेश रोशन आणि बोनी कपूर
राजेश वसाणी यांनी सांगितलं की, दिनेश हिंगू यांच्या पत्नी जमुनाबेन या स्वतः एक गुजराती रंगभूमी कलाकार आहेत आणि त्यांनी अनेक नाटकांत काम केलंय. हिंगू कुटुंबाची परिस्थिती उत्तम असून त्यांना कोणत्याही आर्थिक मदतीची गरज नाही. “ज्या लोकांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. यामध्ये राकेश रोशन, बोनी कपूर आणि आमच्या असोसिएशनसह अनेकांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसमधूनही मदतीसाठी फोन आला होता. मात्र, त्यांच्या पत्नीकडून सत्य परिस्थिती जाणून घेतल्यानंतर, मी त्यांचे आभार मानले आणि सांगितलं की कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असून त्यांना कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही,” असं वसाणी म्हणाले.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाले होते दिनेश हिंगू?
“मी ८६ वर्षांचा आहे. कधीकधी कामासाठी बाहेर जातो. मध्यंतरी पडल्यामुळे मला दुखापत झाली होती, आता ठीक आहे. पण डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसाही लागतो ना? डॉक्टर कधी ५००० तर कधी ६००० रुपये मागतात. सध्या कधीतरी कामावर जातो, पण लोक चरित्र अभिनेत्यांना जास्त पैसे देत नाहीत,” असं ३०० जास्त चित्रपट करणारे दिनेश हिंगू म्हणाले.
दिनेश हिंगू यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘बाजीगर’, ‘हेरा फेरी’, ‘हमराज’, ‘साजन’ आणि ‘नो एंट्री’ सारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. जॉनी लिव्हर आणि परेश रावल यांसारख्या कलाकारांसोबतची त्यांची कॉमेडी टायमिंग विशेष गाजली.
