Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील शोककळा पसरली आहे. समाज माध्यमांवर अनेक कलाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी वाचा : BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

विक्रम गोखले यांनी चित्रपट मालिका आणि नाटक अशा सर्वच व्यासपीठावर काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, अभिनय क्षेत्रातील करिअरच्या सुरुवातीला त्यांना फार कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. पुरेसे पैसे नसल्याने मुंबईत राहायला त्यांना घरही नव्हतं. अशा कठीण परिस्थितीत बिग बी अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती. २०२० साली ईटाम्सला दिलेल्या मुलाखतीत विक्रम गोखलेंनी याचा उल्लेख केला होता.

विक्रम गोखले म्हणाले, “मनोरंजनसृष्टीत काम करत असताना सुरुवातीच्या काळात फार कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. १९९५-९९ काळात मी मुंबईत घर शोधत होतो, पण माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. तेव्हा मला अमिताभ बच्चन यांनी सरकारी घर मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वत: मनोहर जोशी यांना पत्र लिहीलं होतं. त्यामुळे मला मुंबईत सरकारी घर मिळालं. ते पत्र मी अजूनही माझ्याकडे ठेवलं आहे”.

पुढे ते म्हणाले, “अमिताभ बच्चन व मी गेल्या ५५ वर्षांपासून मित्र आहोत. त्यांचा स्वभाव मला आवडतो. मी अजूनही आठवड्यातून एकदा त्यांचे चित्रपट बघतो. मी त्यांनी व ते मला ओळखतात, याचा मला गर्व आहे”.

विक्रम गोखले यांनी याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. यामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही कामही करत होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor vikram gokhale passed away amitabh bachchan help him to get house in mumbai kak
First published on: 26-11-2022 at 15:23 IST