ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली.

माधवी गोगटे यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. इतकंच नव्हे तर त्यांची भूमिका असलेल्या अनेक हिंदी मालिका, चित्रपटही सुपरहिट ठरले. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच ‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.

गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या नाटकांसोबतच अंदाज आपला आपला अशा मराठी नाटकात त्या झळकल्या. तर ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. “तुझं माझं जमतंय” या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

दरम्यान माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veteran marathi actress madhavi gogate passes away nrp

Next Story
गॉसिप