scorecardresearch

आज्जी..

रेखा यांच्या आयुष्यात ‘लाखाची गोष्ट’ घडली आणि त्यांना अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.

Veteran marathi actress rekha kamat
रेखा यांच्या आयुष्यात ‘लाखाची गोष्ट’ घडली आणि त्यांना अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.

दोघी बहिणींना नाच-गाण्याची खूप आवड. मोठी कुमुद आणि तिच्या पाठची कुसुम. शाळेत असतानाच त्यांनी नृत्य व गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. गणेशोत्सवात मेळ्यांमध्ये काम केले. प्रसिद्ध नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. पुढे प्रसिद्ध नृत्यगुरू सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ नृत्यनाटिकेतही त्यांना काम मिळाले. नृत्यनाटिकेतून या दोघी बहिणींना थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोने केले. त्या दोघी बहिणींपैकी मोठी कुमुद सुखटणकर म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत आणि त्यांची धाकटी बहीण कुसम सुखटणकर म्हणजे अभिनेत्री चित्रा नवाथे. मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविलेल्या दोघी बहिणींपैकी रेखा कामत या आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत.

गप्पांच्या सुरुवातीलाच ‘कुमुद’ आणि ‘कुसुम’ यांच्या बदलण्यात आलेल्या ‘रेखा आणि चित्रा’च्या नामकरणाचा विषय निघाला. त्याविषयी रेखा म्हणाल्या, राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीचा १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा माझा पहिला चित्रपट. त्यात चित्राही होती. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावे नकोत. चित्रपटासाठी जरा आकर्षक नावे पाहिजेत म्हणून ‘गदिमां’नी माझे ‘रेखा’ आणि कुसुमचे ‘चित्रा’ असे नामकरण केले. या नावांनी आम्ही मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि पुढे हीच नावे आमची ओळख बनली.

‘लाखाची गोष्ट’ चित्रपट व त्यातील गाणी गाजली. चित्रपटातील ‘माझा होशील का’, ‘त्या तिथे पलिकडे’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटापूर्वीच्या आठवणींचा पट उलगडताना त्या म्हणाल्या, माझे लहानपण मुंबईतच गेले. आम्ही पाच बहिणी आणि दोन भाऊ अशी सात भावंडे. मी मोठी तर चित्रा माझ्या पाठची. आमचे वडील आर्मी व नेव्ही स्टोअरमध्ये ‘लिपिक’ म्हणून नोकरी करायचे. इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण कुंभारवाडा येथील शाळेत झाले. त्यानंतर आम्ही ‘प्लाझा’ चित्रपटगृहाजवळील मिरांडा चाळीत राहायला आलो. त्यामुळे पुढील शिक्षण ‘जनरल एज्युकेशन सोसायटी’च्या छबिलदास शाळेत झाले. मी आणि चित्रा आम्ही दोघीही त्या वेळी आमच्या चाळीत आणि परिसरात होणाऱ्या गणेशोत्सवातील मेळ्यात सहभागी व्हायचो. हे करत असतानाच मी गाणेही शिकत होते. वसंतराव कुलकर्णी हे माझे गाण्यातील गुरू. मेळ्यातून काम करत असल्याने मला सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी मिळाली. यात अमुक एखादी भूमिका नव्हे तर अगदी माकडापासून राक्षसापर्यंत मिळतील त्या भूमिका केल्या. मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातही त्याचे प्रयोग झाले. माझी मैत्रीण कुमुदिनी लेले (पुढे ती कुमुदिनी शंकर झाली)त्यात काम करत होती. त्यामुळे आणि सचिन शंकर यांच्यासारख्या नावाजलेल्या नृत्यगुरूंकडे काम करण्याची संधी मिळत असल्याने घरूनही विरोध झाला नाही. आई-वडिलांनी काम करायला परवानगी दिली. या नृत्यनाटिकेमुळे काही प्रमाणात आमची मिळकत सुरू झाली आणि घरच्या आर्थिक परिस्थितीसाठी ती मोलाची ठरली.

रेखा यांच्या आयुष्यात ‘लाखाची गोष्ट’ घडली आणि त्यांना अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली. अभिनेत्री व नृत्यांगना हंसा वाडकर यांनी रेखा व चित्रा यांचे काम पाहिले होते. निर्माते-दिग्दर्शक राजा परांजपे यांना त्यांनी या दोघी बहिणींची नावे सुचविली. योगायोगाने त्याच वेळी राजा परांजपे ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटाची निर्मिती करत होते. राजा परांजपे यांनी रेखा व चित्रा यांना भेटायला पुण्याला बोलावले. तिथे चित्रपटाचे कथा-पटकथा, संवाद लेखक व गीतकार ग. दि. माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके हेही उपस्थित होते. ‘काहीतरी करून दाखवा’, असे राजाभाऊंनी सांगितल्यावर त्या दोघींनी ‘रामलीला’मधीलच काही प्रसंग करून दाखवले. ते काम पाहून ‘लाखाची गोष्ट’साठी दोघींचीही निवड झाली.

या चित्रपटासाठी पटकथा-संवादाची बाजू गदिमांबरोबरच ग. रा. कामत हेही पाहात होते. पुढे कामत यांच्याशीच रेखा यांची लग्नगाठ जुळली आणि १९५३ मध्ये उभयता विवाहबद्ध झाले. लग्नानंतरही कामतांकडून चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी दिली गेली. सासरकडूनही कोणताही विरोध झाला नाही. त्यामुळेच घर-संसार आणि दोन मुलींचा सांभाळ करताना आपण चित्रपट आणि नाटकात काम करू शकलो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.  ‘लाखाची गोष्ट’ गाजला आणि मराठी चित्रपटसृष्टीला रेखा यांच्या रूपाने घरंदाज, प्रेमळ, शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेली एक उत्तम अभिनेत्री मिळाली. ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात त्यांची दुहेरी भूमिका होती), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘नेताजी पालकर’ चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित ‘यातनाघर’ तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या प्रायोगिक नाटकातही काम केले. त्यांनी आजवर केलेल्या या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. बालगंधर्व यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अहमदाबाद येथे झालेल्या ‘एकच प्याला’च्या प्रयोगाला स्वत: बालगंधर्व उपस्थित होते. प्रयोग झाल्यानंतर रेखा यांच्या अभिनयाचे व भूमिकेचे कौतुक करून त्यांनी आशीर्वाद दिल्याची आठवणही रेखा यांनी सांगितली.

दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही त्यांनी काम केले. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘आजी’ असावी तर अशी, अशी ओळख या मालिकेमुळे त्यांना मिळाली. नव्या पिढीलाही रेखा कामत हे नाव माहिती झाले. अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे आहे. रोज नवा ‘प्रयोग’ आणि प्रेक्षकांची मिळणारी थेट दाद यामुळे नाटक त्यांच्या विशेष आवडीचे आहे. जाहिरातीत काम करणेही आव्हानात्मक आहे. कारण तिथे अवघ्या काही मिनिटांत आपले अभिनयकौशल्य प्रेक्षकांपुढे सादर करायचे असते, असे त्या सांगतात. ‘धि गोवा हिंदूू असोसिएशन’च्या ‘नटसम्राट’मध्ये त्यांना ‘कावेरी’ साकारायची संधी चालून आली होती, मात्र काही कारणाने ती हुकली आणि आपण ‘कावेरी’ साकारू शकलो नाही याची त्यांना आजही खंत वाटते.

रेखा यांना संजीवनी आणि माधवी या दोन मुली. वयाच्या ८३ व्या वर्षांत असलेल्या रेखा यांनी आता वयोपरत्वे काम करणे थांबवले आहे. ‘आजी’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट. खरे तर आजही काम करण्याबाबत त्यांना विचारणा होते. ‘अनेक वर्षे मी या व्यवसायात आहे. अगदी मनासारखे काम मी केले. त्यामुळे आता विचारणा झाली तरी नाही म्हणते, कारण कुठेतरी थांबायला पाहिजे’, असे त्या सांगतात. वाचन हा त्यांचा सध्याचा विरंगुळा आहे. अनुवादित, ललित असे सर्व प्रकारचे साहित्य त्या वाचतात. वाचनातून खूप आनंद मिळतो, असे त्या सांगतात. ‘तू माझा सांगाती’ आणि ‘चाहूल’ ही मालिका वेगळी असल्याने ती अशा दोन मालिका आवर्जून पाहते, असे त्या म्हणाल्या. एका वेळी एकच काम घ्यायचे या तत्त्वामुळे मी तेव्हाही भारंभार कामे घेतली नाहीत. त्यामुळे सकाळी एका ठिकाणी आणि दुपारी दुसरीकडे अशी कसरत कधी केली नाही. जी  काही निवडक कामे केली ती मनापासून आणि जीव ओतून केली. एका वेळी एकच काम केले तर त्या कामावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करू शकता आणि तुमचे काम जास्त कसदार आणि गुणवत्तापूर्ण होते, असे त्यांना वाटते.जनकवी पी. सावळाराम आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या रेखा कामत आयुष्याच्या या टप्प्यावर तृप्त, समाधानी आणि आनंदी आहेत. आत्ताच्या पिढीला चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती असे खूप मोठे क्षेत्र काम करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. पण तरीही हावरटासारखे कामाच्या मागे लागू नका. जमेल आणि झेपेल तेवढेच काम करा. जे काम कराल ते मनापासून आणि प्रामाणिकपणे करा, असा ज्येष्ठत्वाचा प्रेमळ सल्ला देत त्यांनी गप्पांचा समारोप केला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-05-2017 at 01:00 IST