देवांनी केलेले कौतुक लाखमोलाचे

ज्या संगीतकाराकडून खूप काही शिकलो, त्यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या डीव्हीडीचे प्रकाशन माझ्या हस्ते होणे ही खरोखर अविस्मरणीय गोष्ट आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी भावना व्यक्त केल्या.

ज्या संगीतकाराकडून खूप काही शिकलो, त्यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या डीव्हीडीचे प्रकाशन माझ्या हस्ते होणे ही खरोखर अविस्मरणीय गोष्ट आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ संगीतकार व कवी-गीतकार यशवंत देव यांच्यावरील ‘असेन मी नसेन मी’ या तीन डीव्हीडींच्या संचाचे दादर येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात पत्की यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले, त्या वेळी ते बोलत होते. सांगली येथील दंतचिकित्सक डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांच्या ‘चैतन्य मल्टिमीडिया’ची निर्मिती असलेल्या या डीव्हीडी संचाच्या प्रकाशनप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, पं. सत्यशील देशपांडे, पं. शंकर अभ्यंकर, डॉ. चैतन्य, बंडोपंत सोहोनी, आशा मुळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोणताही संगीतकार अन्य संगीतकाराच्या कामाचे सहसा कौतुक करीत नाही, मात्र देवकाका त्याला अपवाद आहेत. ‘राधा ही बावरी’ हे माझे गाणे त्यांनी ‘आकाशवाणी’वर ऐकले, त्यांना ते खूप आवडले, मात्र या गाण्याचा संगीतकार कोण हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘आकाशवाणी’वर दूरध्वनी करून त्याबाबत विचारणा केली. या गाण्याचा गीतकार व संगीतकार मी आहे, हे समजल्यानंतर त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क साधून माझे भरभरून कौतुक केले, त्यांच्याकडून झालेले कौतुक माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे, असे पत्की म्हणाले. पाडगावकर यांनी देवांना शुभेच्छा दिल्या व यापुढेही त्यांनी जोमाने संगीतनिर्मिती करावी, असे आवाहन केले. 

शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना काहीसा अहंगंड असतो, ते स्वत:ला शब्दांच्या पलीकडचे समजतात, आपल्या गायकीत शब्दांना फारसे महत्त्व नाही, अशी त्यांची ठाम धारणा असते, मात्र देवांच्या शब्दप्रधान गायकीचा अभ्यास केल्याने माझ्या ज्ञानात भर पडली आणि शास्त्रीय गायनातही शब्दांना किती महत्त्व आहे, हे मला समजले, असे रोखठोक विचार पं. देशपांडे यांनी व्यक्त केले. सत्कारमूर्ती देव यांनी कवितांच्या माध्यमातून आपल्या हितचिंतकांचे आभार मानले. भाऊ मराठे यांनी या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘शब्द नवे, सूर नवे’ हा कार्यक्रम झाला. यात डॉ. चैतन्य यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मंदार आपटे व भाग्यश्री पांचाळे यांनी सादर केली. भाग्यश्रीने ‘सर्वस्व तुजला वाहुनी आणि विसरशील खास मला’ ही देव यांची गाणीही उत्तम प्रकारे गाऊन उपस्थितांची वाहवा मिळविली. ‘असेन मी नसेन मी’ या प्रत्येकी अडीच तासांच्या तीन डीव्हीडींमध्ये देवांनी शब्दप्रधान गायकीचे महत्त्व समजावून सांगितले आहे. देवांच्या खुदकनिका व पाडगावकरांच्या वात्रटिकांनीही या डीव्हीडीची रंगत वाढविली आहे. पं. सत्यशील देशपांडे यांच्यासह देवांच्या अनेक सहकलाकारांची मनोगतेही यात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veteran marathi musician ashok patki express his gratitude towards yashwant deo