ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या राहत्या घरीच त्यांचं निधन झालं. विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा या ठिकाणी झाला होता. मराठी रंगभूमीवर विजया मेहता यांना बाई म्हणून ओळखलं जायचं. विजयाबाई यांच्या नाटकाच्या शिस्तीच्या मुशीत विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले होते.

विजया मेहता यांची कारकीर्द झळाळी आणणारी

विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. त्यांचे वडील दत्तात्रय जयवंत हे थिऑसॉफिकल सोसायटीत कार्यरत होते. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्य शास्त्राची पदवी घेतल्यानंतर विजया जयवंत यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नाट्य प्रशिक्षण घेतलं. सुप्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अल्काझी यांच्या त्या पट्टशिष्या होत्या. रंगायन ही चळवळ त्यांनी सुरु केली. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकार या संस्थेत कार्यरत होते. नाटक आणि नाटकाचा अवकाश यांची अचूक नस त्यांनी ओळखली होती. मराठी रंगभूमीवर वेगळी क्रांती त्यांच्या नाटकांनी घडवली. हमीदाबाईची कोठी सारख्या नाटकात विजया मेहता या काम करत असत. या नाटकात नीना कुलकर्णी, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्या भूमिका होत्या. त्यांची नाट्य कारकीर्दही प्रदीर्घ आहे.

वैविध्यपूर्ण भूमिका विजया मेहता यांनी साकारल्या

विजया मेहता यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य शाखेतून अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. १९५१ पासून त्या विद्याभवनातील नाटकांमधून अभिनय करत असत. ऑथेल्लो या शेक्सपिअरच्या नाटकाचं मराठी रुपांतर असलेल्या झुंजारराव या नाटकातील कमळजा ही भूमिका त्यांनी साकारली आणि तिथून त्या साहित्य संघाशी जोडल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी संशयकल्लोळ, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार अशा नाटकांमधून काम केलं. १९६० चं दशक येईपर्यंत विजया मेहता या मराठी रंगभूमीचा चेहरा झाल्या होत्या.

वैविध्यपूर्ण नाटकांचं दिग्दर्शन विजयाबाईंनी केलं

विजया मेहता यांचा विवाह दुर्गा खोटे यांच्या मुलाशी म्हणजेच हरीन खोटे यांच्याशी झाला होता. त्यांना रवी आणि देवेन ही दोन मुलं झाली. हरीन खोटे यांचं अकाली निधन झालं, ज्यानंतर विजयाबाईंनी फारोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह केला. विजया मेहता आणि फारोख मेहता यांना अनाहिता ही मुलगी आहे. विविध आकृतीबंधाची, आशय आणि विषयांची नाटकं विजया मेहतांनी दिग्दर्शित केली. एकांकिकांपासून दोन अंकी किंवा तीन अंकी नाटके त्यांनी दिग्दर्शित केली.मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्याछाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आणि त्यांतून कामही केलं. इंडो जर्मान थिएटरसाठी मुद्राराक्षस, शाकुंतल, हयवदन, नागमंडल ही नाटकं त्यांनी जर्मन रंगभूमीवर सादर केली. त्यांच्यासह जर्मन दिग्दर्शक होते ते म्हणजे फ्रिट्स बेनव्हिट्झ दोघांनी मिळून ही नाटकं बसवल्याने दोन भिन्न देशांच्या संस्कृतीचा मिलाफ पाहण्यास मिळाला.

विविध पुरस्कारांनी विजया मेहतांचा गौरव

विजया मेहता यांनी चित्रपट, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका यांच्यासाठीही काम केलं. हयवदन, शाकुंतल (हिंदी-१९८६), हवेली बुलंद थी (१९८७), हमीदाबाई की कोठी (१९८७) या टेलिफिल्म्सही दिग्दर्शित केल्या. तर स्मृतीचित्रे, रावसाहेब, पेस्तनजी हे चित्रपटही दिग्दर्शित केले. गोविंद निहलानी दिग्दर्शित पार्टी, अमोल पालेकर दिग्दर्शित क्वेस्ट या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. झिम्मा आठवणींचा गोफ हे विजया मेहतांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विजया मेहता यांना नाट्यदर्पण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, गो. ब. देवल पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, विष्णुदास भावे सुवर्णपदक, मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.