बॉलिवूडमध्ये अनेकांनी आपलं नशिब आजमावलं आहे. स्टार किड्ससोबत बाहेरून आलेल्या अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्कं केलं नाही तर हिट चित्रपट देत बॉलिवूड गाजवलंही. दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, नवाजुद्दीन सिद्दीकी असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना किंवा अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं. यापैकीच एक म्हणजे उरी फेम अभिनेता विकी कौशल. आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा विकी एकेकाळी दहा बाय दहाच्या खोलीत राहत असं. याचा खुलासा स्वतः विकीनंच डिस्कव्हरीवरील लोकप्रिय शो ‘इनटू द वाइल्ड विथ बेयर ग्रील्स’मध्ये केला आहे.

अभिनेता विकी कौशल लवकरच लोकप्रिय शो ‘इनटू द वाइल्ड विथ बेयर ग्रील्स’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये बेयर ग्रील्सशी बोलताना विकीनं त्याच्या पूर्वीच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यानं आपला जन्म दहा बाय दहाच्या खोलीत झाला असल्याचाही खुलासा केला. विकी म्हणाला, ‘माझा जन्म दहा बाय दहाच्या खोलीत झाला. ज्यात किचन आणि बाथरूमचाही समावेश होता. अशा घरात माझा जन्म झाला आणि आमच्या कुटुंबाचा प्रवासही इथून सुरु झाला. एक कुटुंब म्हणून आम्ही आयुष्यातील प्रत्येक पायरी पाहिली आहे. अनुभव घेतला आहे आणि मला वाटतं हीच गोष्ट भविष्यात तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खंबीर होण्यास मदत करते.’
आणखी वाचा : भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेसोबत ‘पांडू’मध्ये दिसणार प्रविण तरडे

विकी कौशलनं अभिनेता होण्याआधीच त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आपल्या कॉलेज लाइफबद्दल बोलताना विकी सांगतो, ‘मी एक अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होतो आणि माझे वडील मला हे शिक्षण घेताना पाहून खूश होते. कारण माझ्या आधी आमच्या कुटुंबात कोणीच नोकरी केली नव्हती. कोणालाच महिन्याला एक रक्कम पगार म्हणून मिळाली नव्हती. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना इंडस्ट्रीयल भेटीदरम्यान मला या अभियांत्रिकी क्षेत्रात काम कसं चालतं हे पाहण्याची संधी मिळाली. मी पाहिलं की लोक त्यांच्या समोर असलेल्या कम्प्युटर समोर बसून काम करत आहेत. त्यावेळी मला जाणवलं की मला स्वतःकडू यापेक्षा जास्त काहीतरी अपेक्षित आहे. हे क्षेत्र माझ्यासाठी नाही.’

विकी कौशलनं अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या बॉलिवूड कारकिर्दिला सुरुवात केली होती. पण ‘मसान’ या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. त्यानंतर ‘संजू’ या चित्रपटातही त्यानं छोटीशीच पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. पण विकीला खरी ओळख मिळवून दिली ती दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानं. विकीचा हा चित्रपट तूफान गाजला आणि त्यानंतर विकीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.

विकी कौशलच्या अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. याशिवाय मागच्या काही काळापासून तो अभिनेत्री कतरिना कैफसोबतच्या नात्यामुळे सोशल मीडियावर सतत्यानं चर्चेत आहे. हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही बोललं जात आहे. विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो अभिनेत्री सारा अली खानसोबत ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्येही तो झळकणार आहे.