अभि आणि बिंदूच्या प्रेमाचा नवा अध्याय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेरी प्यारी बिंदू या चित्रपटातील नवे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. महाविद्यालयीन दिवसांना उजाळा देणारे हे गाणे ‘मेरी प्यारी..’च्या म्युझिकल ट्रीटमध्ये भर घालत आहे असेच म्हणावे लागेल.
नकाश अझीज आणि जोनिता गांधी यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्याला रेट्रो संगीताचा बाज देण्यात आला असून, सचिन- जिगर या संगीतकार जोडीने ‘ये जवानी तेरी’ या गाण्याला संगीत दिले आहे. कौसर मुनिर यांनी अनोख्या शैलीत लिहिलेल्या या गाण्यामध्ये आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा रेट्रो स्टाईलमध्ये थिरकतानाही दिसत आहेत. त्यामुळे तुम्हीही या गाण्यावर थिरकाल यात शंका नाही.




अक्षय रॉय दिग्दर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता आयुषमान पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे बी- टाऊनमध्ये एका नव्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यशराज बॅनर अंतर्गत आकारास आलेल्या या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्माने केली असून, प्रेमाचा एक वेगळा प्रवास सांगणारा हा चित्रपट १२ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.