कलाविश्वात जर यशस्वी व्हायचं असेल तर रंगरुप किंवा सुडौल बांधा गरजेचा नसून उत्तम अभिनय येणं गरजेचं आहे, हे अभिनेत्री विद्या बालनने सिद्ध करुन दाखवलं. बऱ्याच वेळा बॉडीशेमिंगमुळे ट्रोल झालेल्या विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘परिणीता’, ‘हे बेबी’ या चित्रपटांमध्ये साध्या रुपात दिसणाऱ्या विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून तिच्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिलेल्या विद्याचा परिणीता हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात असेल. या चित्रपटात सहजसुंदर अभिनयामुळे विद्याने अनेकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तिने तब्बल ७५ वेळा ऑडिशन दिल्याचं सांगण्यात येतं.

‘आयएएनएस’नुसार,संगीतकार शंतनू मोइत्रा यांनी परिणीता चित्रपटातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी विद्याला चक्क ७५ वेळा ऑडिशन द्यावं लागलं होतं, असं म्हटलं आहे.

“परिणीता चित्रपटासंबंधीत त्या असाधारण मुलीची आठवण ही कायम माझ्या लक्षात राहणारी ठरली आहे. ती विधू विनोद चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये आमच्यासोबत बसली होती आणि हळूहळू आमच्यात छान मैत्री झाली. तू इथे काय करतेस असा प्रश्न मी तिला विचारला होता. त्यावर ऑडिशनसाठी आले, असं तिने हळू आवाजात सांगितलं होतं. मी विद्या बालनविषयी बोलतोय. हा किस्सा अशा लोकांसाठी सांगतोय, जे पटकन एखाद्या गोष्टीला कंटाळून हार पत्करतात. या मुलीने तब्बल ७५ वेळा ऑडिशन दिले. प्रत्येक वेळी तिला रिजेक्ट करण्यात आलं. तिच्या जागी राहून तुम्ही विचार करु शकता? त्यानंतर प्रदीपने विनोद यांनी नव्या लूकवर काम करण्यास सांगितलं. या काळात अनेक दिग्गज अभिनेत्री ऑडिशनसाठी येऊन गेल्या होत्या. इतकंच नाही तर या परिणीता या भूमिकेसाठी त्यांना फोनदेखील केले जात होते”, असं शंतून म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “मला आजही तो दिवस आठवतोय, ७५ व्या वेळीदेखील रिजेक्ट झाल्यानंतर मुंबईत ब्रायन एडम्स यांचा एक कॉन्सर्ट सुरु होता. त्यावेळी मी तिकडे चालले असं विद्याने मला सांगितलं. त्यावेळी चल अजून एक शेवटचं ऑडिशन घेऊ असं प्रदीप म्हणाला आणि ३.३० वाजता तिने पूर्ण आत्मविश्वासाने हे ऑडिशन दिलं आणि त्यानंतर कॉन्सर्टसाठी निघून गेली. त्यावेळी मी पिया बोले या गाण्यासाठी सेटवर तेथे गेलो होतो. त्याच वेळी अचानकपणे प्रदीप आणि विनोदची चर्चा झाली आणि त्यांना परिणीता मिळाली. त्यावेळी त्यांनी विद्याला फोन लावायचा प्रयत्न केला. मात्र तिचा फोन बंद दाखवत होता. त्यानंतर तिला मेसेज करुन, प्रतीक्षा संपली, तूच परिणीता आहे, असं तिला सांगण्यात आलं. मात्र या प्रकारानंतर विद्या प्रचंड रडली होती. मात्र त्यानंतर तिच्या करिअरचा आलेख कायम उंचावत गेला”.

दरम्यान, ‘परिणीता’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केलं आहे. यात संजय दत्त, सैफ अली खान, दिया मिर्झा हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकले होते.