बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालनचा 'बेगम जान' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात विद्या आणखी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ती वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मालकिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शनापूर्वीपासून या चित्रपटातील तिच्या लूकची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटासाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. मात्र, विद्यासह चित्रपटातील तिच्या सहकलाकारांच्या लूकसाठी डिझायनरचा फार मोठा वाटा आहे. 'बेगम जान'मधील कलाकारांच्या वेशभूषेची जबाबदारी रिक रॉय याच्याकडे होती. त्याने एका मुलाखतीमध्ये कामाचा किस्सा शेअर केला. कलाकारांच्या वेशभूषेविषयी बोलताना तो म्हणाला, " या चित्रपटातील वेशभूषेच्या डिझाइनसाठी फक्त २१ दिवसांचा अवधी मिळाला होता. कलाकारांसोबतच चित्रपटातील व्यक्तिरेखेला शोभणारी आणि वास्तविकता दाखविणारे वेशभूषा असावी, असे सांगण्यात आले होते. हे काम खूप कठीण होते." चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच डिझायनरला अधिक वेळ दिला जातो. मात्र, रिक रॉयला फारच कमी वेळात हे काम पूर्ण करण्यास सांगितले होते. काम पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी विद्या बालन आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांचे सहकार्य मिळाल्याचेही तो म्हणाला. रिक म्हणाला, मी जेव्हा कॉल करेल तेव्हा या दोघांनी मला सहकार्य केले. ड्रेस ट्राय करुन पाहण्यासाठी विद्याला एकदा चक्क रात्रीचे साडे अकरा वाजता कॉल केला होता. एवढेच नाही तर वेशभूषेसंदर्भात विद्यासोबत अनेकदा रात्री उशिरापर्यंत चर्चा केल्याचे तो म्हणाला. या चित्रपटामध्ये विद्या बालन, गोव्हर खान, पल्लवी शारदा, इला अरुण, यांच्यासह नसरुद्दीन शाह आणि चंकी पांडे ही कलाकार मंडळी दिसणार असून, हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.