Vijay Deverakonda quit drinking: ‘अर्जुन रेड्डी’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘रोमांचकम’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने हजेरी लावली. यावेळी विजयने आपल्या आयुष्यातील विविध रोमांचक टप्प्यांवर भाष्य केले. दारू सोडणं, प्रेमभंग आणि प्रेमात पडणं याचा उल्लेख त्याने केला.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने त्याला २०२६ मधील त्याच्यासाठी सर्वात रोमांचक क्षण कोणता होता, असा प्रश्न विचारला. यावर फक्त हे वर्ष किंवा रश्मिका मंदानाबरोबरचं लग्न न म्हणता त्याने त्याच्या आयुष्यातील काही प्रसंगांचा उल्लेख केला. विजय देवरकोंडा म्हणाला, “माझा जन्म १९८९ मध्ये झाला आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यातील प्रत्येक वर्ष रोमांचक राहिलं आहे. खिशात पैसे असोत किंवा नसोत, मी व्हिस्की प्यायचो. पण आता मी दारू पिणं सोडून दिलं आहे.”

रश्मिका मंदानाची प्रकृती कशी आहे? विजय म्हणाला…

दारू सोडण्याचे नेमके कारण न सांगता विजय पुढे म्हणाला, “मी प्रेमात पडलो, ब्रेकअप झालं, वाईट वाटलं आणि नंतर पुन्हा प्रेमात पडलो आणि माझं लग्न झालं. काहीही असो, माझं आयुष्य नेहमीच रोमांचक राहिलं आहे.” त्याचं हे वक्तव्य ऐकून संदीप रेड्डी वांगा हसू लागला आणि त्याने टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. कार्यक्रमात उत्सुक चाहत्यांनी विजयला त्यांच्या ‘वहिनीं’बद्दल म्हणजेच रश्मिकाबद्दल विचारलं. यावर विजय म्हणाला, “तुमची वहिनी? ती ठीक आहे. तिला दुखापत झाली आहे, पण ती हळूहळू बरी होत असून घरी आराम करतेय.”

विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाचं नातं

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी पहिल्यांदा २०१८ साली ‘गीता गोविंदम’मध्ये एकत्र काम केलं होतं. नंतर त्यांनी ‘डियर कॉम्रेड’ चित्रपट केला. २०२० मध्ये दोघांचे एकाच लोकेशनवरील फोटो व्हायरल झाले, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. जवळपास ६ वर्षे डेट केल्यावर या जोडप्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये साखरपुडा केला आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूर इथे लग्नगाठ बांधली.

दरम्यान, ‘रोमांचकम’ हा एक तेलगू रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून तो ३ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुमंत प्रभास आणि अनंथिका सानिलकुमार मुख्य भूमिकेत आहेत. वेणू गोपाल रेड्डी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.