रश्मिका मंदानाने ‘गीता गोविंदम’च्या सेटवरील विजय देवरकोंडाबरोबरच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. त्यावेळी रश्मिका इंडस्ट्रीत नवीन होती. विजयने तिने लावलेलं गाणं बंद करण्यास सांगितल्याने तिला वाईट वाटलं आणि ती रडली होती असं तिने म्हटलं आहे.

रश्मिका आणि विजयने नुकतंच प्रखर गुप्ताच्याशी संवाद साधताना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. रश्मिकाने सांगितलं की, ती विजयला सर म्हणायची. कारण त्यावेळी ती इंडस्ट्रीत नवीन होती, तर विजयने त्याआधीच तीन-चार चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि तो तिच्यापेक्षा अनुभवी होता. रश्मिका म्हणाली, “मला आठवतं, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला सेटवर भेटले, तेव्हा मी त्याला सर म्हणायचे. कारण मी इंडस्ट्रीत नवीन होते आणि तोपर्यंत त्याने तीन-चार चित्रपट केले होते. पहिल्याच दिवशी मी सेटवर असंच काहीतरी गाणं लावलं होतं आणि तो म्हणाला, ते गाणं बंद कर.” विजयने मान्य केलं की त्याच्या बोलण्याचा रश्मिकावर काय परिणाम होईल, याची त्याला कल्पना नव्हती. तो म्हणाला की तो नेहमीच स्पष्टवक्ता राहिला आहे आणि समोरची व्यक्ती त्याच्या बोलण्यामागचा हेतू समजून घेईल, असं त्याला वाटायचं.

विजय देवरकोंडामुळे रश्मिका रडली

विजयने शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रश्मिकाला नेमकं काय म्हटलं होतं, हे सांगितलं. तो म्हणाला, “मी स्पष्टवक्ता आहे आणि समोरची व्यक्ती माझ्या बोलण्यामागचा हेतू समजून घेईल, असं मी गृहीत धरतो. आपण मोकळेपणाने आणि स्पष्टपणे बोलू शकतो, असं मला वाटतं. पण जेव्हा तुम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखत नसता, तेव्हा ती माझं म्हणणं समजून घेईल, असं गृहीत धरणं माझी चूक होती. मी सहज म्हणालो, तू हे काय फालतू गाणं लावलं आहेस?” त्याने पुढे सांगितलं की, त्यावेळी त्यांना एकच लॉक्ड कारवॅन शेअर करावी लागली होती. ते दोघेही त्यावेळी मोठे स्टार नसल्यामुळे कारवॅनचा अर्धा भाग रश्मिकासाठी, तर अर्धा भाग विजय आणि त्याच्या टीमसाठी होता. याचदरम्यान विजयने रश्मिकाला मोठ्याने “तू हे काय फालतू गाणं लावलं आहेस?” असं म्हटलं होतं.

रश्मिकासाठी विजयचं हे बोलणं स्वीकारणं कठीण होतं. कारण त्यावेळी ती नुकतीच फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, “तुमचा सहकलाकार तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यावर हीच गोष्ट सांगतो, बरोबर?” विजयने नंतर सांगितलं की रश्मिकाच्या डोळ्यांत अश्रू आले होते, कारण तिला वाटलं की विजयला ती आवडत नाही. “तिच्या डोळ्यांत अश्रू होते, कारण तिला वाटलं की मला ती आवडत नाही.” रश्मिकाने त्यावेळी तिची प्रतिक्रिया इतकी तीव्र का होती, याचं कारणही सांगितलं. ती म्हणाली, “कारण ती जागा माझ्यासाठी नवीन होतं, नवीन इंडस्ट्री होती.”

रश्मिकाने विजयला सर म्हणणं केलं बंद

रश्मिकाने सांगितलं की तिने तिच्या मनातल्या भावना लगेच विजयला सांगितल्या नव्हत्या. त्यावेळी ती खूप संवेदनशील होती, असंही तिने मान्य केलं. ती म्हणाली, “मी त्यावेळी खूपच संवेदनशील होते आणि प्रत्येक गोष्टीमुळे मला वाईट वाटायचं. सेटवर गेल्यानंतर आम्ही चित्रपटाचं काम सुरू केलं. तो मला डायलॉग्स समजून घेण्यासाठी मदत करायचा. प्रत्येक वेळी मी त्याला सर म्हणायचे, तेव्हा तो म्हणायचा, मला तसं म्हणणं बंद कर. माझं एक नाव आहे, मला त्या नावाने हाक मार. त्यानंतर अर्थातच मी त्याला विजय म्हणू लागले आणि मग आमची मैत्री झाली.”

दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता हे दोघे पुन्हा एकदा ‘रणबाली’ या चित्रपटातून पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. राहुल संकृत्यायन दिग्दर्शित हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.