Vijay Deverakonda Rashmika Mandanna: दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, विराट कोहली-अनुष्का शर्मा, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख, रणबीर कपूर- आलिया भट्ट, करीना कपूर खान- सैफ अली खान अशी अनेक सेलिब्रिटी जोडपी लोकप्रिय आहेत.

आता या यादीत आणखी एका जोडप्याची भर पडली आहे. हे जोडपे म्हणजे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे आहे. २६ फेब्रुवारी २०२६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली. त्याच्या काही दिवस आधी त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर करत नवीन सुरुवात करणार असल्याचे सांगितले होते.

जेव्हा त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले, तेव्हा चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला होता, त्यानंतर त्यांच्या संगीतातील काही फोटोदेखील व्हायरल झाले आहेत.

याबरोबरच रश्मिका आणि विजयने लग्नानंतर मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. ते व्हिडीओ व्हायरल झाले होते. यावेळी चाहतेदेखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले.

लग्नानंतर विजय देवरकोंडाने केली घोषणा

आता मात्र विजयने केलेल्या एका घोषणेची चर्चा होत आहे. लग्नानंतर विजय तेलंगणातील त्याच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील अचमपेटमधील पैतृक गावात गेले होते. तेथील स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी विजयने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.

९ वी आणि १० वीमध्ये शिकणाऱ्या ४४ सरकारी शाळेतील विद्यार्थांना देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थांना मदत करणे, पैशांच्या अडचणीमुळे त्यांचे शिक्षण थांबू नये हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच तो त्याच्या गावी सतत येईल असा विश्वासदेखील त्याने गावकऱ्यांना दिला. जेव्हा विजयने ही घोषणा केली, त्यावेळी रश्मिकादेखील तिथे उपस्थित होती. तिने पारंपरिक वेशभूषेतून लक्ष वेधून घेतले. विजयने मुलांना शिक्षणासाठी मदत करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आनंद व्यक्त करत तिने टाळ्याही वाजवल्या. विजयने ही घोषणा केल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आता रश्मिका आणि विजय लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘राणाबली’ असे या सिनेमाचे नाव आहे. ११ सप्टेंबर २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, याआधी रश्मिका आणि विजयने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांत एकत्र काम केले होते.