Rashmika Mandanna fixing Vijay Deverakonda mustache : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना या लोकप्रिय जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. फक्त दक्षिणेकडील राज्यांमध्येच नाही, तर संपूर्ण देशामध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक वर्षांपासून डेटिंगवरून चर्चा होत असलेल्या या जोडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्नगाठ बांधली. दरम्यान, विजय व रश्मिका एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आले. जबरदस्त चर्चेत असलेल्या जोडप्याचा खास ट्रॅडिशनल लूक लक्षवेधी ठरला. यावेळी रश्मिका व विजय यांच्यातील प्रेम दिसून येत होते. रश्मिकाने विजयच्या मिशीची स्टाईल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यातील दोघांचा रोमँटिक अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
गरजू विद्यार्थांना रश्मिका-विजयची मदत
रविवारी विजय देवरकोंडाने रश्मिकासह थुम्मनपेट गावातील तेलंगणा अचमपेट मंडळाला भेट दिली. या जोडप्याने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. रश्मिका व विजयने गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत, शिष्यवृत्ती योजनेला सुरुवात केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांसाठी ही मोठी मदत असल्याचे मानले जात आहे.
स्टेजवर घेतली एकमेकांची काळजी
या कार्यक्रमाच्या वेळी विजय व रश्मिका यांचा स्टेजवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्टेजवर प्रचंड गर्दी आणि गोंधळ असतानाही दोघे एकमेकांची काळजी घेत, एकमेकांना मदत करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्या या प्रेमळ कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर त्याबाबतची चर्चा जोरदार रंगली आहे.
कार्यक्रमाच्या स्टेजवरही या जोडप्यातील प्रेम दिसून आले. रश्मिका मंदानाने टिश्यूने विजयच्या कपाळावरील घाम पुसला, तसेच त्याच्या मिशा नीट करण्यास मदत केली आणि तो छान दिसत असल्याचे सांगण्यासाठी त्याच्याकडे बघून गोड स्मित करत मान डोलावली. रश्मिका व विजयच्या या प्रेम व्यक्त करणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, विजयची ही जुन्या हिरोंसारखी स्टाईल खूपच सुंदर दिसते. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, खऱ्या आयुष्यातील कॉम्रेड…! दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, ही जगातील सर्वांत सुंदर जोडी आहे,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
रश्मिकाचा खास लूक
तेलंगणा अचमपेट मंडळाच्या या खास कार्यक्रमाला अभिनेत्री रश्मिका मंदानाने खास दाक्षिणात्य स्टाईल साडी लूक केला होता. तिच्या सहजसुंदर सौंदर्यांने चाहत्यांना घायाळ केले. यावेळी रश्मिकाने पिवळ्या व चॉकलेटी रंगाच्या कॉन्ट्रासमध्ये साडी परिधान केली होती. साडीवर गोल्डन जरीची चौकट असलेली डिझाईन होती. मिनिमल मेकअपसह तिने केसांची अंबाडा हेअरस्टाईल केली होती. त्यामध्ये लावलेला गजरा लक्ष वेधून घेत होता. त्यासह रश्मिकाने गोल्डन दाक्षिणात्य ज्वेलरी आणि मोठी टिकली लावून, तिचा लूक पूर्ण केला होता. रश्मिका मंदानाच्या या खास आणि सिंपल लूकमधील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
रश्मिका व विजय यांचे लग्न
या वर्षाच्या सुरुवातीपासून अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरजवळील एका रिसॉर्टवर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या दोघांनी विवाह केला. समारंभानंतर काही तासांतच रश्मिका आणि विजय या दोघांनीही इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो शेअर केले होते. त्यातील लग्नामधल्या खास लूकची जोरदार चर्चा रंगली होती. रश्मिका व विजय हे एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनेकदा त्यांचे परदेशातील एकत्रित फोटो व्हायरल झाले होते; मात्र त्यांनी कधीही जाहीरपणे नात्याची कबुली दिली नव्हती. पण, रश्मिका व विजयने थेट लग्नाचे फोटो शेअर करीत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.
