Vijay Deverakonda Rashmika Mandanna Wedding: सध्या सगळीकडे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची चर्चा आहे. अधिकृतपणे या दोघांनी कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नसली, तरी त्यांच्यातील केमिस्ट्री आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स बरंच काही सांगून जातात. अशातच आता ते लग्न करणार आहेत. त्यांचे चाहते या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. लग्नाला अवघे काही दिवस उरले असताना विजय देवरकोंडाच्या घराच्या सजावटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

विजय व रश्मिका या दोघांची पहिली भेट ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडली. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची मैत्री झाली. तेव्हा रश्मिकाने रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता, पण नंतर काही कारणास्तव तो साखरपुडा मोडला. मग रश्मिका व विजयने ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपट केला. या काळात रश्मिका कठीण काळातून जात होती आणि विजयने तिला मानसिक आधार दिला. इथूनच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, असं म्हटलं जातं. आता इतकी वर्षे नात्यात राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

विजय देवरकोंडाचं हैदराबादमधील घर सजलं

विजय व रश्मिकाच्या लग्नाला एक आठवडा बाकी आहे. यानिमित्ताने विजय देवरकोंडाचे हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आले आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विजयाचे संपूर्ण घर सोनेरी रंगाच्या ‘कर्टन लाईट्स’ने उजळून निघाले असून, घराबाहेर फुलांची सजावटही करण्यात आली आहे. भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी घर सजवण्याची ही लगबग पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाहा विजय देवरकोंडाच्या घराचा व्हिडीओ

विजय व रश्मिकाच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण

व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेनुसार आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका व विजय २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न करणार आहेत. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग राजस्थानमधील उदयपूर येथे होईल. लग्नात पाहुण्यांसाठी ‘नो फोन पॉलिसी’ असणार आहे, जेणेकरून लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ लीक होणार नाहीत. तसेच लग्नाचे शूटिंग करणाऱ्या टीमनेही फोटो व व्हिडीओ लीक करू नये यासाठी करार केला आहे, असं म्हटलं जातंय.

हैदराबादमध्ये होणार रिसेप्शन

विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाचे लग्न उदयपूरमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खासगी सोहळ्यात होईल. त्यानंतर, ४ मार्च २०२६ रोजी हैदराबादमधील ‘ताज कृष्णा’ हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. या सोहळ्याला दाक्षिणात्य आणि बॉलीवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नाच्या ‘इन्व्हिटेशन हॅम्पर’मध्ये विजयाच्या ‘Rowdy’ ब्रँडचा पिवळा टी-शर्ट, काजूचा बॉक्स आणि ‘नॅशनल क्रश’ नावाचे परफ्युम अशा हटके वस्तू पाठवण्यात आल्या आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.