Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Wedding Updates : मनोरंजनसृष्टीतील स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघंही आज ( २६ फेब्रुवारी ) राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचा लूक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ‘विरोश’ त्यांचे वेडिंग फोटो केव्हा शेअर करणार याची सगळेजण वाट पाहत होते. अखेर रश्मिका-विजयने त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत एकमेकांसाठी भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत.
विजय देवरकोंडा लग्नाचे फोटो शेअर करत लिहितो, “एके दिवशी मला तिची आठवण येत होती…एवढी आठवण येत होती की सहज वाटून गेलं आज ती माझ्याबरोबर असती तर दिवस किती छान गेला असता…आम्ही एकत्र असतो तेव्हा मला जेवताना दोन घास जास्त जातात. आम्ही जेव्हा एकत्र वर्कआऊट करतो तेव्हा व्यायाम करणं शिक्षा वाटत नाही…त्यावेळी एक वेगळा आनंद मिळतो. माझ्या आयुष्यात कायम तिची गरज होती. म्हणूनच माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला आज मी माझी बायको बनवलंय. २६ फेब्रुवारी २०२६.” तर, रश्मिकाने सुद्धा लग्नाचे फोटो शेअर करत याला ‘My Husband’ असं कॅप्शन दिलं आहे.
रश्मिका-विजयने आज २६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सात फेरे घेतले. या दोघांचा विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही परंपरेनुसार पार पडला आहे.
विजय-रश्मिकाने लग्नासोहळ्यात पारंपरिक दाक्षिणात्य लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. लाल रंगाची साडी, गळ्यात सोन्याच्या माळा- हार, बाजूबंद, कमरपट्टा, हातात पारंपरिक बांगड्या या लूकमध्ये रश्मिका अगदी राणीसारखी दिसतेय. तर, विजयने सुद्धा धोतर-लाल रंगाचा शेला असा रॉयल लूक लग्नसोहळ्यात केला होता. ‘विरोश’चे चाहते या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
हळद, संगीत, ‘विरोश प्रीमियर लीग’, मेहंदी असे सगळे कार्यक्रम पार पडल्यावर आज रश्मिका आणि विजय साता जन्माचे सोबती झाले आहेत.
रश्मिका-विजयचा शाही लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला असून, या दोघांच्या लग्नाला कुटुंबीय, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील काही मोजकेच मित्रमंडळी उपस्थित होते. आता उदयपूरमध्ये थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर विजय-रश्मिकाने ४ मार्चला त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचं आयोजन हैदराबादमध्ये केलं आहे. याठिकाणी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.

