गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांच्या विरोधात ‘बॉयकॉट’ ट्रेंड चर्चेत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटल्यानंतर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू होती. आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. काही नेटकऱ्यांनी #BoycottLiger असा ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु केला आहे. नुकतंच विजय देवरकोंडाने या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘चलो इश्क लडाए सनम’ म्हणत दहीहंडी कार्यक्रमामध्ये नवनीत राणांचा गोविंदासह धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

२५ ऑगस्टला ‘लायगर’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर, विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला आर्थिक नुकसान तर सहन करावं लागणार नाही ना अशी भीती या चित्रपटाच्या निर्मात्यांना सतावत आहे. आता विजयने याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

विजय म्हणाला, “करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप मेहनत घेतली आहे. त्यानंतरच मी इथवर पोहोचलो आहे. मला विश्वास आहे की लोक माझ्यावर आणि ‘लायगर’वर प्रेम करतील. कारण आम्ही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.” तसेच विजयने बॉयकॉट ट्रेंडबाबतही स्पष्ट मत मांडलं आहे.

आणखी वाचा – सोनाली फोगाट यांच्या निधनानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आईला रात्री फोन केला आणि…”

“आम्ही खूप मेहनतीने चित्रपट बनवला आहे आणि आमचं यामध्ये काही चुकलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही. आईचा आशिर्वाद, लोकांचं प्रेम, देवाची साथ आहे. आम्हाला कोण थांबवणार, बघू.” असं विजयने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.