Trisha Krishnan and Archana Kalpathi friendship news in Marathi: चित्रपटसृष्टीत अनेक निर्माते आणि स्टार्स बरेच चित्रपट एकत्र करतात, त्यामुळे त्यांची मैत्री होते. तर, काही कलाकार व निर्माते एकत्र काम केलं नसूनही चांगले मित्र आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीतील याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्रिशा कृष्णन व अर्चना कल्पथी आहेत.
अर्चना कल्पथी थलपती विजयच्या ‘बिगिल’ आणि ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT) सारख्या मोठ्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘एजीएस एंटरटेनमेंट’च्या (AGS Entertainment) सीईओ आहेत. त्यांनी ‘गॅलाटा’ला दिलेल्या मुलाखतीत त्रिशाबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगितलं. ही मैत्री केवळ दाखवण्यापुरती किंवा व्यावसायिक नाही. कारण दोघींचीही मैत्री त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच झाली होती.
त्रिशा कृष्णन व अर्चना कल्पथी यांची मैत्री
अर्चना कल्पथी म्हणाल्या, “त्रिशा ही माझी इंडस्ट्रीबाहेरची मैत्रीण आहे. मी तिला चित्रपटांमुळे ओळखत नाही. आम्ही दोघी एकाच बॅचच्या आहोत. आमची मैत्री शाळा-कॉलेजच्या काळातील आहे. मी तिला अनेक वर्षांपासून ओळखते आणि कदाचित याच कारणामुळे आम्ही कधीही एकत्र काम करत नाही.”
मैत्री असूनही एकत्र काम का करत नाही दोघी?
चित्रपटसृष्टीत मैत्री असली की ते स्टार व निर्माते कधी ना कधी एकत्र काम करतात, हिट चित्रपट देतात. पण अर्चना कल्पथी आणि त्रिशा यांनी आपली मैत्री या सर्वांपासून पूर्णपणे दूर ठेवली आहे. याचं कारणही अर्चना यांनी सांगितलं. “आमच्यात कोणतेही मतभेद किंवा दुरावा नाही, परिस्थिती अगदी उलट आहे. ही मैत्री आमच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे की, ती कामात आणणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्रिशा ही माझी सर्वात आवडती व्यक्ती आहे. आम्ही दोघी खूप आनंदी स्वभावाच्या आहोत आणि एकत्र असताना आम्ही आमच्याच वेगळ्या विश्वात असतो,” असं अर्चना कल्पथी म्हणाल्या.
त्रिशाचं कौतु करत अर्चना कल्पथी म्हणाल्या…
अर्चना मैत्रीनंतर कामाबद्दल बोलल्या, तेव्हा त्यांचा सूर बदलला. त्या केवळ मैत्रिणीचं कौतुक करण्यासाठी बोलत नव्हत्या, तर चित्रपटसृष्टीवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्या आणि आकड्यांचे गणित चांगल्या प्रकारे समजणाऱ्या एका निर्मात्या म्हणून बोलत होत्या. अर्चना म्हणाल्या, “त्रिशा ही प्रचंड मेहनती अभिनेत्री आहे.” त्यानंतर त्यांनी एक उदाहरण देऊन आपलं म्हणणं पटवून दिले. “‘करुप्पू’ (Karuppu) चित्रपटाचं यश तुम्ही पाहू शकता,” असं त्या म्हणाल्या.
अर्चना कल्पथी यांनी त्रिशाचं कौतुक फक्त एका चित्रपटापुरतं केलं नाही. “तुम्ही चित्रपटसृष्टीतील प्रत्येक मोठ्या स्टारचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट काढून पाहिला, तर तुम्हाला त्या चित्रपटात त्रिशा नक्कीच दिसेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
आर. जे. बालाजी यांचे दिग्दर्शन असलेला ‘करुप्पू’ चित्रपट १५ मे रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये सूर्याने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. यात त्रिशा कृष्णन एका महत्त्वाच्या सहाय्यक भूमिकेत आहे. हा चित्रपट सूर्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात त्रिशाच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. दरम्यान, तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळापासून सक्रिय असलेल्या त्रिशाने विजय, अजित, सूर्या, कमल हासन, महेश बाबू आणि प्रभास यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
