Joseph Vijay Grants Special Permission For Trisha Krishnan’s Movie : तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतल्यानंतर विजय यांनी लगेचच कामाला सुरुवात केली आहे. मंगळवारी अभिनेते कमल हासन यांनी राज्यातील ७१७ दारूची दुकाने बंद करण्याच्या निर्णयासाठी विजय यांचं कौतुक केलं.

याचबरोबर तमिळ चित्रपटसृष्टीच्या फायद्यासाठी विजय यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेता सूर्याचा आगामी अॅक्शन चित्रपट ‘करुप्पू’ Karuppu साठी सकाळी ९ वाजताच्या शोला विशेष परवानगी देण्यात आली आहे. दिग्दर्शक व अभिनेता आर.जे.बालाजी दिग्दर्शित या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सूर्यासह अभिनेत्री त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

विजयने त्रिशाच्या चित्रपटासाठी घेतला मोठा निर्णय

मंगळवारी संध्याकाळी एसआर प्रभू आणि एसआर प्रकाशबाबू यांच्या Dream Warrior Pictures या निर्मिती संस्थेच्या अधिकृत एक्स हँडलवरून मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असलेल्या जोसेफ विजय यांचा फोटो शेअर करण्यात आला. त्याबरोबर ‘करुप्पू’ चित्रपटाच्या सकाळी ९ वाजताच्या शोसाठी विशेष परवानगी दिल्याची माहिती देण्यात आली.

पोस्टमध्ये लिहिलंय की #Karuppu च्या सकाळी ९ वाजताच्या शोला विशेष परवानगी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री थिरू जोसेफ विजय यांचे विशेष आभार. १५ मेपासून #Karuppu चा फर्स्ट डे फर्स्ट शो सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.” दिग्दर्शकानेसुद्धा त्याच्या एक्स हँडलवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. ‘करुप्पू’ या चित्रपटात सूर्या मुख्य भूमिका साकारत असून तो करुप्पुस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटाचा दिग्दर्शक व अभिनेता आर.जे.बालाजी आणि त्रिशा कृष्णन वकीलांच्या भूमिकेत आमनेसामने दिसणार आहेत.

या चित्रपटामुळे तब्बल २१ वर्षांनंतर सूर्या आणि त्रिशा पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. याआधी ते दिग्दर्शक ‘हरी’ यांच्या २००५ मधील अॅक्शन चित्रपट ‘आरू’मध्ये एकत्र दिसले होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार १४ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने भारतभरात पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून आधीच ४.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘करुप्पू’साठी सकाळी ९ वाजताच्या शोला विशेष परवानगी घ्यावी लागली, कारण तमिळनाडूमध्ये लवकर सकाळचे शो सहसा ठेवले जात नाहीत. इतर राज्यांमध्ये सकाळचे शो नियमीत असले तरी तमिळ सुपरस्टार्सच्या प्रचंड चाहतावर्गामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्रशासनाला असते.

पूर्वी राज्यात सकाळी ४ वाजताचे शो खूप लोकप्रिय होते. मात्र २०२३ मध्ये दोन मोठ्या चित्रपटांच्या क्लॅशदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अशा लवकर सकाळच्या शोवर कडक निर्बंध आणले. त्यामुळे आता सकाळच्या विशेष शोसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यावेळी दिग्दर्शक H. Vinoth यांचा ‘थुनीवू’ Thunivu आणि दिग्दर्शक Vamshi Paidipally यांचा Varisu हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामध्ये अजीत कुमार आणि जोसेफ विजय होते. त्यामुळे या दोन अभिनेत्यांच्या चाहत्यांमुळे सकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत शो ठेवण्यात आले होते, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. Thunivu च्या सेलिब्रेशनदरम्यान झालेल्या गोंधळात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर डीएमके सरकारने सकाळच्या शोवर निर्बंध आणले. आता सकाळी ९ वाजल्यानंतरच शो दाखवण्याची परवानगी दिली जाते आणि त्यासाठीही विशेष मंजुरी आवश्यक असते.

‘करुप्पू’साठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून अनेक जण गुरुवारी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, काही जणांनी या चित्रपटात त्रिशा कृष्णन मुख्य अभिनेत्री असल्याकडेही लक्ष वेधलं आहे. अलीकडच्या काळात त्रिशा आणि विजय यांच्या कथित नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर्षी दोघे एका लग्नसमारंभात एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं. त्याचवेळी विजय यांची पत्नी संगीता यांनी विजय यांचे एका अभिनेत्रीशी असलेल्या कथित संबंधांमुळे घटस्फोटासाठी अर्ज केल्याची चर्चा देखील समोर आली होती.