प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विजय राजला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ‘शेरनी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एका अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता विजयने यावर वक्तव्य केले आहे.

नुकताच विजय राजने ‘बॉम्बे टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘महिलांच्या सुरक्षिततेची मला जाणीव आहे. मला देखील २१ वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे मला त्या परिस्थीतीचे गांभीर्य आहे. मला चौकशीशिवाय दोषी असल्याचे ठरवले. मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. हे खूप दुर्दैवी आहे. मी या इंडस्ट्रीमध्ये गेल्यी २३ वर्षांपासून काम करत आहे’ असे विजय राजने म्हटले आहे.

पुढे त्याने, ‘मी खूप मेहनत घेऊन माझे करिअर घडवले आहे. खूप कष्टाने माझे घर उभे केले. कोणीही येऊन कोणाचे करिअर कसे उद्ध्वस्त करु शकतो? कोणी काही तरी बोलले आणि तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात? समोरच्या व्यक्तीकडून काय झाले हे जाणून घेण्या आधीच तुम्ही मला दोषी ठरवले.’

‘मला माहिती नाही या केसमधून काय सिद्ध होणार आहे. पण तुमच्यावर एक ठपका बसतो. चौकशी करण्यापूर्वीच मला दोषी ठरवण्यात आले. त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला आहे. माझे वडिल जे दिल्लीमध्ये राहतात त्यांना आणि माझ्या मुलीला समाजाचा सामना करावा लागत आहे’ असे विजयने म्हटले आहे.