Rajinikanth & Thalapathy Vijay Controversy : अभिनेते सी. जोसेफ विजय आणि त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने तमिळनाडूमध्ये सत्ता मिळवत राज्यातील राजकारणाचं चित्रच बदलून टाकलं आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यातील पारंपरिक राजकीय लढत विजय यांच्या पक्षामुळे ढवळून निघाली आहे. सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे, पक्ष स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच विजय यांनी हे मोठं यश मिळवलं आहे.

गेल्या अनेक दशकांत अनेक अभिनेते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यात एमजी रामचंद्रन (एमजीआर) आणि जे. जयललिता यांना सर्वाधिक यश मिळालं. मात्र, विजय यांनी जितक्या कमी वेळात इतकं मोठं यश मिळवलं, तसं इतर कुणालाही मिळालेलं दिसत नाही. राजकारण हे असं क्षेत्र आहे, जिथे अनेक मोठ्या सुपरस्टार्सनाही सिनेमासारखं यश मिळवता आलं नाही. चिरंजीवी आणि कमल हासन ही त्यामधील मोठी उदाहरणं मानली जातात.

विजय यांच्या आधी राजकारणात येण्याची सर्वाधिक चर्चा ज्या अभिनेत्याबद्दल झाली, ते म्हणजे ‘सुपरस्टार’ रजनीकांत. १९९० च्या दशकापासूनच त्यांच्या राजकारणात प्रवेशाबद्दल चर्चा सुरू होती, मात्र त्यांनी कधीही प्रत्यक्ष राजकारणात उडी घेतली नाही. २०२० मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष सुरू करण्याची घोषणा केली होती आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारीही दर्शवली होती. पण अखेरच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलला.

थलपती विजय यांनी रजनीकांत यांचं केलेलं कौतुक

विशेष म्हणजे, विजय यांनी एकदा सांगितलं होतं की त्यांना जर कुठल्या व्यकतीच्या मार्गावर चालायचं असेल तर ते रजनीकांत आहेत. विजय यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे पाहिलं तर त्यांनी केवळ रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं नाही, तर रजनीकांत यांनाही जे साध्य करता आलं नाही, तेही करून दाखवलं.

२००० च्या दशकात ‘सन टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत विजय यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले, “असं नाही की मला एखादा अभिनेता आवडत नाही. मला सगळेच कलाकार आवडतात. प्रत्येकामध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं. पण प्रत्येकाचा एक आवडता कलाकार असतोच. मला जर कोणाच्या मार्गावर चालायचं असेल, तर ते रजनीकांत आहेत.”

त्या काळात विजय यांनी अनेकदा आपण रजनीकांत यांचे मोठे चाहते असल्याचं सांगितलं होतं. मात्र, गेल्या काही वर्षांत दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सतत वाद होताना दिसतात. इतकंच नाही, तर दोघांमध्ये स्पर्धा आणि मतभेद असल्याच्या चर्चाही बऱ्याच काळापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे दोघे एकाच पिढीतील कलाकार नाहीत. विजय यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, तेव्हा रजनीकांत आधीच सुपरस्टार म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचले होते.

विजय-रजनीकांत यांच्यामध्ये होती स्पर्धा?

‘जेलर’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात रजनीकांत यांनी सांगितलेल्या “कावळा आणि गरुड” या गोष्टीचाही अनेकांनी चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटलं जातं. काही लोकांनी हा टोला विजय यांच्यावर असल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या बोलण्याचा उद्देश विजय यांना लक्ष्य करणं नव्हता.

‘कावळा आणि गरुड’ या गोष्टीचा लोकांनी वेगळाच अर्थ काढला. सोशल मीडियावर अनेकांनी ती गोष्ट विजय यांच्या विरोधात असल्याच्या अफवा पसरवल्या. हे खूप निराशाजनक आहे,” असं रजनीकांत यांनी म्हटलं होतं.

रजनीकांत यांनी विजय यांना दिलेला ‘हा’ सल्ला

‘लाल सलाम’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चमध्ये त्यांनी पुढे सांगितलं, “विजय माझ्या डोळ्यासमोर मोठा झाला आहे. धर्मथिन थलैवन चित्रपटाच्या शूटिंगवेळी तो फक्त १३ वर्षांचा होता आणि वरून मला पाहत उभा होता. शूटिंगनंतर एस. ए. चंद्रशेखर यांनी विजयची माझ्याशी ओळख करून दिली. विजयला अभिनयाची आवड असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याला काही सल्ला द्यावा असं मला म्हटलं. तेव्हा मी विजयला आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता.”

रजनीकांत पुढे म्हणाले, “यानंतर विजय अभिनेता झाला आणि आज तो आपल्या शिस्त, मेहनतीमुळे यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. आता तो राजकारणातही प्रवेश करत आहे. आमच्यात स्पर्धा असल्याचं ऐकून वाईट वाटतं. विजयनेही अनेकदा सांगितलं आहे की तो स्वतःचाच प्रतिस्पर्धी आहे आणि मीही हेच म्हटलं आहे. आम्हा दोघांची तुलना करणं किंवा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत असं म्हणणं योग्य नाही. त्यामुळे आमच्या चाहत्यांनी तुलना करू नये, अशी मी विनंती करतो.”

विजय यांच्या विजयांनंतर रजनीकांत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिलं, “अलीकडेच पार पडलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये शानदार विजय मिळवल्याबद्दल तमिळगा वेत्री कळघमचे अध्यक्ष विजय आणि त्यांच्या पक्षातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”