Thalapathy Vijay from Actor to Politician: सध्या दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकार विजय थलपती मोठ्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत विजयचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. जवळजवळ दीड वर्षांपूर्वी हा पक्ष स्थापन झाला होता.
विजय थलपतीच्या राजकीय यशामागे दडलंय सिनेमांचं मोठं गणित
अभिनेत्याचा सिनेमातील प्रवास पाहिला तर त्याने अचानक राजकारणात एन्ट्री घेतली नाही, तर दीर्घकाळापासून तो राजकारणात येण्याबद्दल विचार करत होता, त्याची दिशा ठरवत होता असे पाहायला मिळते.
विजय थलपती हा दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांचा मुलगा आहे. विजयने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तो एस. ए. चंद्रशेखर म्हणजेच वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या नालैया थीरपू या सिनेमातून प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा १९९२ ला प्रदर्शित झाला होता.
कारकिर्दीच्या सुरुवातीला चॉकलेट बॉयची भूमिका
सुरुवातीला त्याने कौंटुबिक आणि रोमँटिक सिनेमांत काम केले, त्यामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीला अभिनेत्याची चॉकलेट बॉय अशी ओळख होती. ९० च्या दशकातील त्याच्या चित्रपटांतून कोणताही राजकीय संदेश दिला जात नव्हता. मात्र, तो सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा बनला, त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
स्थानिक प्रश्न मांडणारे चित्रपट
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला विजयने अॅक्शन सिनेमांत काम करायला सुरुवात केली. २००२ ला थमीझान हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा अब्दुल माजिथ यांनी दिग्दर्शित केला होता, यामध्ये विजयबरोबर प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील विजयच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. एक तरुण समाजहित जपणाऱ्या मुलाची भूमिका अभिनेत्याने साकारली होती. त्यानंतर अभिनेत्याने घिल्ली (Ghilli) तसेच पोक्किरी यांसारख्या चित्रपटांमधून त्याची ही प्रतिमा अधिक ठळक केली.
हे चित्रपट मुख्यतः मनोरंजनासाठी बनवले गेले होते, मात्र त्यामध्ये समाजातील औपचारिक संस्थांवर फारसा विश्वास दिसत नव्हता. विजयची चित्रपटातील पात्रे पारंपरिक यंत्रणा जिथे अपयशी ठरतात, तिथे स्वतः न्याय देताना दिसली. प्रशासनातील गुंतागुंत आणि राजकीय अकार्यक्षमता यामुळे जो समाज थकलेला होता, त्या समाजात त्याची ही प्रतिमा अधिक खोलवर पोहोचली.
२०११ च्या आसपास, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) ने विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर, विजयच्या चित्रपटांमध्ये एक स्पष्ट राजकीय वळण दिसू लागलं. ए. आर. मुरुगादॉस (A. R. Murugadoss)सारख्या दिग्दर्शकांनी थुप्पाकी (Thuppakki) आणि कथ्थी (Kaththi) सारखे चित्रपट बनवले, ज्यामध्ये स्थानिक प्रश्न मांडले गेले.
कथ्थीमध्ये शेतकऱ्यांच्या संकटाचा आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून नैसर्गिक संसाधनांच्या शोषणाचा मुद्दा मांडला गेला. या चित्रपटात मार्क्सवाद हा तात्त्विक सिद्धांत म्हणून नाही, तर दैनंदिन जीवनातील साध्या उदाहरणातून समोर आला. विजय जेव्हा पोट भरल्यानंतर घेतलेली एक अतिरिक्त इडलीही दुसऱ्याचा हक्क आहे असे म्हणतो, तेव्हा संवाद केवळ किमतीपुरते मर्यादित न राहता ‘हक्क’ (entitlement) या संकल्पनेवर आधारित होते. अशा प्रकारे चित्रपटात वर्गसंघर्षाला नैतिक जाणिवेत रूपांतरित केलं, जे प्रेक्षकांपर्यंत थेट आणि सहज पोहोचलं.
प्रेक्षकांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यक्तीरेखा
२०१७ ला मर्सल (Mersal) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये आरोग्य व्यवस्थेवर आणि तिच्या वाढत्या व्यापारीकरणावर तीव्र टीका करण्यात आली. त्यानंतर ए. आर. मुरुगादॉस यांनी दिग्दर्शित केलेल्या सरकार सिनेमात त्याने सुंदर नावाच्या टेक सीईओची भूमिका साकारली होती. तो भारतात परतल्यावर त्याचं नाव मतदार यादीत नसल्याचं पाहतो. यानंतर तो व्यवस्थेला आव्हान देतो आणि निवडणूक गैरप्रकारांविरुद्ध लढा देत, वंचित मतदारांच्या हक्कांसाठी उभा राहतो. हे चित्रपट केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नव्हते; त्यांनी गुंतागुंतीच्या धोरणात्मक मुद्द्यांना भावनिक पातळीवर मांडले. विजयने साकारलेली पात्रे केवळ चित्रपटातील हीरो म्हणून मर्यादित नव्हती, तर ती पात्रे बदल घडवण्याची तीव्र इच्छा असलेले सुधारक होते. त्याच्या व्यक्तिरेखा थेट प्रेक्षकांशी संवाद साधत, हक्क आणि कर्तव्य, प्रशासन आणि सत्तेला जबाबदार धरणे याबद्दल बोलत. विजयच्या चित्रपटांतील नायक सामान्य माणसाचा आवाज बनतात. सामाजिक न्याय, कल्याणकारी धोरणं आणि भ्रष्टाचारविरोधी विचार हे त्याच्या सिनेमातील प्रमुख विषय होते.
चॉकलेट बॉय ते सुधारणाकेंद्रित नायक
विजयचा राजकारणात येण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही, तर अभिनयापासून ते राजकीय क्षेत्रात जाण्यापर्यंत चित्रपटांतून त्याच्या प्रवासाला एक दिशा मिळाल्याचे दिसते. सुरुवातीच्या काळातील रोमँटिक, चॉकलेट बॉय, सहानुभूतीपूर्ण असलेली त्याची चित्रपटांतील प्रतिमा सरकार, कथ्थी या चित्रपटांतून सुधारणाकेंद्रित नायकापर्यंतचा एक काळजीपूर्वक घडवलेला त्याचा पडद्यावरील प्रवास पाहायला मिळतो.
विजयच्या चित्रपटांतून त्याने त्याची सामान्य माणसासाठी प्रशासन आणि न्याय या केंद्रस्थानी ठेवलेली एक राजकीय प्रतिमा तयार केली आहे. विजयचा राजकीय प्रवास फक्त पक्ष स्थापन करण्याने किंवा एखाद्या प्रभावी भाषणाने सुरू झालेला नाही; तो पडद्यावरच सुरू झाला होता, त्या कथांमधून त्याला हळूहळू नायकाचा नेता बनवलं. वर्षानुवर्षे राजकीय प्रतीकांनी भरलेल्या चित्रपटांमधून त्यानी आपली प्रतिमा घडवली आहे.
