Karuppu Movie : दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांच्या १५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘करुप्पू’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या चित्रपटासाठी सुरियाऐवजी सुरुवातीला विजय जोसेफ यांची निवड करण्यात आली होती असं स्वत: चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितलं आहे.

अलीकडील एका मुलाखतीत दिग्दर्शक आर.जे.बालाजीने हा खुलासा केला. त्याने सांगितलं की, ते विजय यांच्याबरोबर या चित्रपटाबाबत चर्चा सुरू होत. पण काही कारणांमुळे अभिनेता-राजकारणी विजय हा चित्रपट करू शकले नाहीत. दिग्दर्शक नेमकं काय म्हणाले आणि विजय यांनी या चित्रपटासाठी का नकार दिला जाणून घेऊयात…

…म्हणून विजय यांनी दिलेला नकार

हॉलीवूड रिपोर्टर इंडियाशी संवाद साधताना दिग्दर्शक बालाजी म्हणाला, “ही कथा मी सर्वात आधी विजय सरांना सांगितली होती. राजकारणात पूर्णवेळ प्रवेश करण्यापूर्वीचा हा त्यांचा शेवटचा चित्रपट असणार होता. आमच्या दोन-तीन भेटी झाल्या आणि त्यांनी कथा ऐकली होती. पण हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागला. त्याचवेळी त्यांच्याकडे दिग्दर्शक H.Vinoth यांच्या ‘जन नायगन’ या चित्रपटाचाही पर्याय होता. त्यानंतर विजय यांनी मला एका आठवड्यात कळवतो असं सांगितलं. नंतर त्यांनी फोन करून काही कारणांमुळे हा चित्रपट करू शकत नसल्याचं सांगितलं आणि ती कारणं मला योग्य वाटली”.

आर.जे बालाजी पुढे म्हणाला, “मी त्यांना उत्तर दिलं की, सर, तुमच्या निर्णयाचा मी पूर्ण आदर करतो. तोपर्यंत मी त्यांना दोन चित्रपटांच्या कथा सांगितल्या होत्या. याआधीही मी त्यांना एका दुसऱ्या चित्रपटाची कथा ऐकवली होती. दोन्ही वेळा त्यांनीच माझ्याकडे काही चांगलं आहे का, अशी विचारणा केली होती. मला वाटतं, हा त्यांचा माझ्या कामावरील विश्वास आहे.”

विजय यांनी चित्रपट करू शकत नसल्याचं सांगितल्यानंतर आर.जे.बालाजी यांनी ही कथा सूर्या यांना ऐकवली. बालाजी म्हणाला, “अशा प्रकारे हा चित्रपट अखेर सुरियाचा झाला. विजय यांनी चित्रपट केला नाही, तरी त्यांनी कथा ऐकली, यामुळेच मला हा चित्रपट बनवण्याची संधी मिळाली. म्हणूनच मी चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडिट्समध्ये त्यांचे आभार मानले. कथा ऐकल्यानंतर त्यांनी मला योग्य प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांमुळे माझी स्क्रिप्ट आणखी चांगली झाली.”