चरित्र भूमिकेतही आपल्या अभिनयाने काही वेगळेपणा देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेला अभिनेता म्हणून विक्रम गायकवाड याची ओळख आहे. ‘उंच माझा झोका’ मालिकेतील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या भूमिकेतून विक्रमचा चेहरा घरोघरी परिचयाचा झाला. तिथपासून वेबमालिका, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ असे चित्रपट, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’सारखी मालिका अशा सगळ्या माध्यमातून कार्यरत असलेला हा अभिनेता लवकरच समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपट उलगडणारा ‘रघुवीर’ हा नीलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित चित्रपट येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. अभिराम भडकमकर आणि नीलेश कुंजीर लिखित ‘रघुवीर’ चित्रपटात रामदास स्वामींच्या भूमिकेविषयी विचारणा झाली तेव्हा पहिल्यांदा खरंतर भीतीच वाटली होती, असं विक्रमने सांगितलं. ‘माझं व्यक्तिमत्त्व आणि आपण आजवर समर्थ रामदासांची जी प्रतिमा चित्रांमधून पाहिलेली आहे, ते खूप भव्य असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे मी तसा दिसू शकेन का? वाटू शकेन का? अशी शंका माझ्या मनात होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश कुंजीर यांनी माझ्या छायाचित्रावर समर्थ रामदास यांच्यासारखे स्केच काढून दाखवलं तेव्हा मी किमान तसा दिसू शकतो हे लक्षात आलं. मग पुढची मेहनत मलाच करायची होती.’ अशी आठवण विक्रमने सांगितली. हेही वाचा >>> अभिरुचीसंपन्न साहित्य अभिवाचनाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग रामदास स्वामींचा उल्लेख झाल्यावर आपोआपच मनाचे श्लोक, दासबोधासारखा ग्रंथ, सज्जनगडावरचे त्यांचे वास्तव्य, शिवाजी महाराजांवर असलेला त्यांचा प्रभाव अशा जुजबी गोष्टी आपल्यासमोर येतात. मात्र ‘रघुवीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी उभारलेल्या कार्यामागचा त्यांचा उद्देश काय होता, इथपासून बऱ्याच गोष्टी उलगडल्या असं तो सांगतो. ‘रामदास स्वामींचा जन्म कुठे झाला ते अंतापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर ७२ वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी ११०० मठांची स्थापना केली. हे आजच्या काळातही कोणाला जमणं सहजशक्य नाही. मनाचे श्लोक, दासबोध अशा कित्येक गोष्टी त्यांनी इतक्या कमी काळात करून ठेवल्या आहेत. सामान्य व्यक्ती हे करूच शकत नाही. इतकं मोठं कार्य उभारणाऱ्या व्यक्तीचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे, विचार खोल असला पाहिजे आणि त्यांचं लक्ष त्या ध्येयावरच केंद्रित असलं पाहिजे’, असं मत त्याने व्यक्त केलं. मग मनाचे श्लोक कशाला? समर्थ रामदास स्वामींचं कार्य हे आपल्याला खोलात जाऊन विचार करायला लावणारं आहे. ते फक्त देवाविषयी बोलले नाहीत. तसं करायचं असतं तर त्यांनी मनाचे श्लोक लिहिले नसते, असा स्पष्ट मुद्दा विक्रम मांडतो. ‘संतांना आपण बऱ्यापैकी देव करायला जातो. संत हे समाजाचं प्रबोधन करत असतात, तत्कालीन समाजात काय कमी आहे आणि काय केल्याने त्यांची उन्नती होईल हे त्यांना कळतं म्हणून ते संत म्हणवले जातात. प्रत्येक वेळी त्यांना देव दिसण्याची गरज नसते. अगदी समर्थ रामदासांनाही देवाविषयीच सगळं सांगायचं असतं तर त्यांनी मनाचे श्लोक लिहिले नसते. सगळं जर देवच करून देणार असेल तर मनाचं सामर्थ्य वाढवण्यात काय अर्थ आहे? पण त्यांना माहिती होतं त्या काळात तरुणांना बलोपासना करण्याची गरज का आहे? तरुणांनी मनाची आणि शरीराची शक्ती वाढवली पाहिजे यावर त्यांनी भर दिला होता. त्यांचे विचार आणि त्या दिशेने त्यांचा झालेला प्रवास या चित्रपटातून सविस्तर उलगडणार आहे’, अशी माहिती त्याने दिली. या भूमिकेसाठी तीन महिने वेगळ्या पद्धतीने व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते, अशी माहिती देतानाच आधी अशा काळातील भूमिका केल्या असल्याने भाषेवर फार मेहनत घ्यावी लागली नाही. मध्येमध्ये काही हिंदी भाषेतील प्रसंग चित्रित केले असल्याने तेव्हा जी हिंदी भाषा वापरली आहे त्यावर थोडं काम करावं लागलं, असं त्याने सांगितलं. एखादी चरित्र भूमिका साकारताना साहजिकच त्याचे गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वात उतरत जातात, असा अनुभवही त्याने सांगितला. ‘चरित्र भूमिका साकारताना प्रत्यक्ष चित्रीकरणाचे दोन - तीन महिने तुम्ही त्या व्यक्तिरेखेबरोबर असता आणि भूमिकेची पूर्वतयारी म्हणून त्याआधी दोन महिने तुम्ही अभ्यास करता तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीचे गुण, त्याची दूरदृष्टी, शिस्त अशा काही गोष्टी नकळत आपल्यात भिनत जातात’, असं विक्रम म्हणतो. अभिनयाची प्रचंड आवड असल्याने कुठल्याही माध्यमात काम करायला आवडतं, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे आत्ताही तो मालिका आणि चित्रपट दोन्ही माध्यमांत काम करतो आहे. अमूक एक आवडतं असा विचार न करता जी भूमिका समोर येईल त्याचा विचार करून ते मी करतो, असं तो म्हणतो. आगामी ‘रघुवीर’ चित्रपटात त्याने साकारलेल्या रामदास स्वामींच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.