मराठी रंगभूमी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून नुकतंच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर अनावरण करण्यात आलं.

हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित ‘बेवारस’ या चित्रपटाची प्रस्तुती शिवआर्यन फिल्म्सने केली आहे. हरिणी प्रॉडक्शन्सच्या रिया कुमार, नितीन विचारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन विजय राणे यांचं आहे, तर पटकथा, संवाद लेखन शिरीष लाटकर यांचं आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा आणि महेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत तर यश सुर्वे यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी या चित्रपटात साकारली आहे. एक लहान मुलगा आपल्या अधिकारांसाठी आपल्याच आई-वडिलांना कोर्टात का खेचतो याची अनोखी कथा या चित्रपटात दाखविण्यात आली असून सोबत सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. त्यामुळे विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती असलेल्या या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

Award Banner