vikram gokhale passes away saleel kulkarni emotional post goes viral | "अगदी २५- ३० दिवसांपूर्वी भेट झाली..." विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट | Loksatta

“अगदी २५- ३० दिवसांपूर्वी भेट झाली…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात निधन झालं. गीतकार सलील कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर करत विक्रम गोखले यांच्याप्रती आपल्या भावनांना वाट करून दिली

“अगदी २५- ३० दिवसांपूर्वी भेट झाली…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात निधन झालं.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात निधन झालं. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गीतकार सलील कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर करत विक्रम गोखले यांच्याप्रती आपल्या भावनांना वाट करून दिली.

सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. सलील कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “विक्रम गोखले सर. चित्रपट, रंगभूमी, संगीत, साहित्य सगळ्याचीच उत्तम जाण असणारा खऱ्या अर्थाने दिग्गज कलाकार …”

आणखी वाचा- “आधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षेंची संतप्त प्रतिक्रिया

सलील कुलकर्णी यांची पोस्ट-

“विक्रम गोखले सर
चित्रपट
रंगभूमी
संगीत
साहित्य

सगळ्याचीच उत्तम जाण असणारा खऱ्या अर्थाने दिग्गज कलाकार …

एका चित्रपटासाठी एक खूप ताना असणारा अभंग रेकॉर्ड करायला सुरुवात करत होतो…सुरेशजी वाडकर गायला सुरुवात करताना म्हंटले, “हा अभंग बॅकग्राऊंड ला आहे ना ? कारण ह्यावर लिप सिंक करणारे फारच कमी अभिनेते आहेत….” मी म्हटलं ,” विक्रम गोखले सर आहेत ” सुरेशजी पटकन म्हणाले, ” मग प्रश्नच नाही…त्यांना गाणं पण तेवढंच चांगलं कळतं..”

कलेच्या प्रत्येक क्षेत्रात आदर मिळालेला हा देखणा, कसदार अभिनेता प्रत्यक्ष दिसणार नाही ह्याचं दुःख मोठं आहे…

अगदी २५- ३० दिवसांपूर्वी भेट झाली.. ते नवीन चित्रपट करणार होते …त्या संदर्भात भेटायचं ठरलं…आणि…

काहीही सकस पाहिलं..ऐकलं…की तुमची आठवण कायम येत राहील.”

सलील कुलकर्णी यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी या कमेंट्समध्ये विक्रम गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका युजरने लिहिलं, “लिहायचं किती आणि काय यांच्याबद्दल. शब्दच अपुरे पडतात. अभिनयाच्या उत्तम जाणकाराला खरं तर अख्ख्या अभिनय पाठशाळेत नमन” आणखी एका युजरने लिहिलं, “मराठी चित्रपटसृष्टीतील अप्रतिम कलाकार, तुम्ही कायम आठवणीत राहाल गोखले सर”

आणखी वाचा-“चित्रपटात आणि अभिनयात तुम्ही माझे बाप…” सुबोध भावेची विक्रम गोखलेंबद्दल भावुक पोस्ट

दरम्यान विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर अभिनयाबरोबरच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं होतं. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 08:37 IST
Next Story
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार