रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांच्या प्रकृती आणखी ढासळली. आज संध्याकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशान भुमित अंत्यसंस्कार होणार आहेत. नुकतंच विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.

BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टिवर शोककळा पसरली आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखले या नावाचा चांगलाच दबदबा होता. नुकतंच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी संवाद साधला आणि त्यांचं मन मोकळं केलं.

दिलीप प्रभावळकर म्हणाले, “ज्याची भीती होती तेच झालं. त्याच्या आजाराविषयी मला माहिती होतं. मला वाटलं होतं त्यातून तो बरा होईल, पुन्हा आम्ही भेटू. तो माझा खूप जवळचा मित्र होता. त्याला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्हाला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम ‘बॅरीस्टर’ या नाटकाच्या माध्यमातून बघता आला. जयवंत दळवी यांचं लेखन, विजय मेहता यांचं दिग्दर्शन आणि विक्रम गोखले यांची अप्रतिम भूमिका म्हणजे आमच्यासाठी एक मोठा वस्तूपाठ होता. विक्रम हा नुसता अभिनेता नव्हता, ती एक अभिनयाची संस्था होती. विजय केंकरे यांच्या ‘अप्पा आणि बाप्पा’ या नाटकात मला विक्रमबरोबर काम करायची संधी मिळाली. त्याचा स्टेजवरील वावर, वाचिक अभिनयावरील हुकूमत, शिस्त, भाषा, उच्चार हे सगळं मी एक सहकलाकार म्हणून फार जवळून पाहिलं आहे. अशा नटाबरोबर रंगमंचावर एकत्र काम करणं हा फार आनंददायी अनुभव होता. मराठी नाट्यसृष्टीत विक्रमपेक्षा चांगलं मराठी बोलणारा नट शोधून सापडणार नाही असं मला वाटतं. तो आणि त्याचे वडील पुढील पिढीला प्रशिक्षण देण्यात पुढे असायचे शिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यातसुद्धा ते कायम तत्पर होते.”

विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram gokhle passes away in pune marathi actor dilip prabhavalkar speaks about him avn
First published on: 26-11-2022 at 15:38 IST