बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सैफ आणि हृतिकचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या ते दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सोशल मीडिया सक्षम असल्याने सध्या प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचं मत मांडते. चित्रपटाच्या बाबतीतही अनेक लोक रिव्यू करतात. दरवेळेस ते समीक्षक योग्य पद्धतीनेच घेतलं जातं असं नाही. सैफ अली खानने याच समीक्षणाबद्दल त्याचं मत एका मुलाखतीमध्ये मांडलं आहे.

याबद्दल सैफ म्हणाला की, “कधीकधी खूप समीक्षणं समोर येतात तेव्हा माझा गोंधळ उडतो. प्रत्येक समीक्षणात वेगळंच लिहिलेलं सापडतं. मी ३ ते ४ मोजक्या लोकांची समीक्षणं वाचतो, जे खरंच उत्तम लिहितात आणि त्यांच्या त्या लिखाणातून मला शिकायलाही मिळतं. अर्थात मी यासाठी माझ्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देतो. नुकतंच करीनाने चित्रपट पाहिला आणि तिला तो प्रचंड आवडला आणि त्याबद्दल तिने शेअरही केलं. तिचं मत माझ्यासाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे.”

२००२ मध्ये आलेल्या ‘ना तूम जानो ना हम’नंतर बऱ्याच वर्षांनी हृतिक रोशन आणि सैफ एकत्र दिसणार आहेत. हृतिकबरोबर काम करताना खूपच धमाल आली असंही सैफने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. हा चित्रपट पुष्कर-गायत्री दिग्दर्शित २०१७ च्या तामीळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटातील आर.माधवनची भूमिका सैफ साकारत आहे.

आणखी वाचा : Photos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल

या भूमिकेबद्दल आणि माधवनच्या कामाबद्दल सैफ म्हणाला, “लोकांनी तुलना केली तर ती स्वागतार्हच असेल. माझ्या मनात माधवनबद्दल प्रचंड आदर आहे. त्याने फार उत्तम काम केलं आहे. कुणीतरी मला सांगितल्याचं आठवतंय आकाशगंगेत कसे लाखो तारे असतात पण प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं असतं तसंच आम्हा फिल्मस्टार्सच्या बाबतीत आहे. मी माझ्याकडून या भूमिकेसाठी १००% द्यायचा प्रयत्न केला आहे. लोकांना ते आवडेल अशी आशा करतो.” सैफ, हृतिक, राधिका आपटे यांचा ‘विक्रम वेधा’ ३० सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.