दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ ‘दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य’ (एम.एस. के.) ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष असून अँड. मोहनराव पिंपळे हे अध्यक्ष आहेत. नुकताच मुंबई येथील ग्रँड हयात, सांताक्रुज येथे हा रंगतदार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
याप्रसंगी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम या पुरस्कार सोहळ्याला आपण मला बोलावलेत यासाठी मी आपला आभरी आहे. खरंतर मला अशा विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी आमंत्रित केले जाते. परंतु मी बहुतांशी वेळा जात नाही. त्याचे कारण असे की, सांस्कृतिक मंत्रीने स्टेजवर जाऊन पुरस्कार देण्यापेक्षा तॊ धोरणातून दिसला पाहिजे असे माझे मत आहे. मल्टीप्लेक्सला मराठी चित्रपटांसाठी प्राईम टाईम मिळवून देण्याच काम हे सांस्कृतिक मंत्र्याचे आहे. इथे मी आलो त्याची दोन करणे आहेत. एकतर दिपाली ताई एकदा कधीतरी निवडणूक लढल्या होत्या त्यामुळे राजकीय माणसाने राजकीय माणसाच्या मागे उभे राहिले पाहिजे आणि गेल्या वेळी मी आलो होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत. तेव्हा मी एक सूचना केली होती की, मागे दादासाहेब फाळके हे मराठीत लिहावे ते यावर्षी लिहिले आहे की नाही ते पाहण्यासाठी आलो आणि यावर्षी ते लिहिलेले आहे. जसे सिनेमागृहात चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत दाखविले जाते त्याचप्रमाणे दादासाहेब फाळके याची ३० सेकंदाची कां होईना पण एक चित्रफीत आपण दाखविण्याचा एक नवीन नियम येत्या आगामी काळात करणार असल्याचे ही सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोलताना सांगितले.
यंदाचा ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार २०१५ सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना किरण शांताराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मला खूप आनंद झालाय, शब्दही सुचत नसून आजवर तसे मला अनेक पुरस्कार मिळाले आगामी काळातही मिळतील परंतु दादासाहेब फाळके याच्या नावाने देण्यात येणार्‍या या जीवन गौरव पुरस्काराला तोड नाही. या इंडस्ट्रीत येउन मी धन्य पावले आहे. आजवर अनेक लोकांनी मला जी काही मदत केली त्यासर्वांचे मी मनापासून आभार मानते अशा शब्दात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.