विराजस कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका, नाटक ते चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम करत असतो. अभिनयासह लेखन व दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. विराजस अनेकदा त्याची मतं प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतो. अशातच आता त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. विराजसने लग्नापूर्वी त्याच्या दोन अटी होत्या असं सांगितलं आहे.
विराजस व अभिनेत्री शिवानी रांगोळे हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांची लव्ह स्टोरीसुद्धा तितकीच खास आहे. परंतु, अनेकांना माहीत नसेल की विराजस आणि शिवानी यांच्यामध्ये वयाचं अंतर असून शिवानीनेच विराजसला प्रपोज केलं होतं. असं अमृता फिल्मसला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं आहे. यावेळी त्याने आधी शिवानीकडे फार गांभीर्याने लक्ष दिलं नव्हतं आणि तो तिला लहान समजायचा असंही सांगितलं आहे.
शिवानीबद्दल विराजसची प्रतिक्रिया
विराजस म्हणाला, “मी कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असताना तिची नुकतीच दहावी झाली होती. आमचं एकत्र कुटुंब आहे माझी चुलत बहीण शिवानीच्या वयाची होती. त्यामुळे बहिणीच्या वयाच्या मुलीला गांभीर्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे पाच-सहा वर्षे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता ती अनेकदा मला याबद्दल आठवण करुन देत असते. तेव्हा आम्ही नाटकाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करायचो. त्यामुळे ही त्यात लहान तर तिच्याकडे कोण लक्ष देणार असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. पण नंतर तिने स्वत:वर खूप काम केलं.”
विराजस शिवानीबद्दल पुढे म्हणाला, “शिवानीलाही वाचनाची आवड आहे. मलाही वाचनाची आवड आहे. घरुनही काही विरोध नव्हता कारण ती लहानपणापासूनच कामानिमित्ताने आमच्या घरी यायची. तिने माझ्या आईबरोबर कामही केलं होतं. त्यामुळे त्या दोघींची छान मैत्री झाली होती आणि शिवानीची आई माझ्या आई-वडिलांच्या कॉलेजमध्ये होती. त्यामुळे त्यांची ओळख होती.” विराजसने पुढे सांगितलं की नंतर त्या दोघांनी एकत्र काम केलं आणि त्यांची मैत्री अजून घट्ट झाली त्यानंतर करिअरमध्ये सेटल झाल्यासारखं वाटत असताना दोघेही लग्नासाठी तयार होते.
विराजसने ठेवलेल्या दोन अटी
विराजसने पुढे लग्न करण्यापूर्वी त्याच्या दोन अटी असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “एकतर लग्न करायचंच आहे असा माझा हट्ट नव्हता. मला आनंदी राहायचंय एवढंच होतं त्यात जर लग्न झालं तर चांगलं आहे, नाही झालं तरी हरकत नाही. पण, लग्न केलंच तर निदान तीन वर्षे तरी डेट केलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं. की तेवढी ओळख माझी असली पाहिजे की तीन वर्षे सगळी भांडणं, सगळे रुसवे-फुगवे सगळं कळलं पाहिजे मगच तो निर्णय घेणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ३० वर्षांचा होईपर्यंत लग्न करायचं नव्हतं. कारण तोपर्यंत मला वाटत नव्हतं की लग्नासारखा निर्णय घेण्यासाठी मी तितका समजुतदार आहे वगैरे आणि नशीब असं होतं की बरोबर ३० वर्षांचा होतो तेव्हा लग्न केलं. २ मेला डेटिंगला तीन वर्षे पूर्ण झाली आणि ३ मेला लग्न केलं. त्यामुळे दोन्ही अटी पूर्ण झाल्या होत्या.”
