Virender Sehwag Praises Hanuman Ansh : नीम करोली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘हनुमान अंश’ या भक्तिमय चित्रपटाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या चित्रपटाचे मनापासून कौतुक केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक विशेष व्हिडीओ शेअर करत सेहवागने सर्व प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटर्समध्ये जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटातील भावुक आणि अध्यात्मिक प्रसंगांनी आपले मन जिंकले, असं सेहवागने सांगितलं.
विरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सेहवाग म्हणाला, “काही अनुभव आणि काही व्यक्ती अशा असतात ज्यांचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. तुम्ही त्यांच्याबद्दल कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी शब्द सपाडत नाही. माझे काही जवळचे मित्र नीम करोली बाबांचे भक्त आहेत. साधारण १० वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासून मी त्यांच्याविषयी ऐकत आणि वाचत आलो आहे. मला महाराजजींबद्दल नेहमीच प्रचंड आकर्षण राहिलंय. त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची भक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाने अनेक लोकांचं आयुष्य बदललं. माणसाची स्वतःच्या खऱ्या रूपाशी भेट घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात होती.”
सेहवाग म्हणाला, “५२ वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं, पण आजही त्यांचे आशीर्वाद त्यांच्या भक्तांच्या पाठीशी आहेत. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट पाहिला. खरं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य एका चित्रपटात दाखवणं अशक्य आहे, पण हा चित्रपट खूप सुंदर लिहिलाय आणि बनवला आहे.”
सेहवागने सांगितला हनुमान अंशमधील आवडता प्रसंग
चित्रपटातील आवडत्या प्रसंगाबद्दल सेहवाग म्हणाला, “या चित्रपटातील एका प्रसंगाने माझं मन जिंकलं. महाराजजी सापांनी वेढलेले असतात. तेव्हा त्यांचा एक भक्त त्यांना म्हणतो की ‘तुम्ही शिवजींप्रमाणे भोळे आहात’, त्यावर महाराजजी म्हणतात, ‘भोळा तर तू आहेस, कारण आपल्या मनात जे असतं तेच आपल्याला डोळ्यांना दिसतं.’ कदाचित हाच मेसेज त्यांना आपल्या सर्वांना द्यायचा होता. आपल्या देशाच्या इतिहासात अशा संतांचा जन्म दुर्मिळच होतो. त्यांना पूर्णपणे समजून घेणं अशक्य आहे, मात्र त्यांची एक झलक पाहणं नक्कीच शक्य आहे. ‘हनुमान अंश’ तुम्हाला तीच झलक उत्तमरित्या दाखवतो. जर तुम्हाला बाबांबद्दल माहिती असेल तर हा चित्रपट नक्की पाहा आणि जर त्यांच्याबद्दल ऐकलं नसेल, तर तो तुम्ही आवर्जून पाहायला हवा.”
वीरेंद्र सेहवागने चित्रपट पाहिल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेने दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी भारावले आहेत. विराट व अनुष्काने हा चित्रपट पाहावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. विराट-अनुष्का नीम करौली बाबा यांच्या आश्रमात दर्शनासाठी बरेचदा जात असतात.
‘हनुमान अंश’चे लेखन व दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. या चित्रपटात चंदन आनंद आणि शोभिनव सत्या मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे. भारतात उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ११ सप्टेंबरला हा चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे.
