Jwala Gutta blessed with baby girl : भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आई झाली आहे. ४१ वर्षीय ज्वालाने आनंदाची बातमी शेअर केली आहे. ज्वाला व तिचा पती अभिनेता-निर्माता विष्णू विशाल एका गोंडस लेकीचे आई- बाबा झाले आहेत. विष्णू विशालने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना लेकीच्या जन्माची माहिती दिली.
ज्वाला गुट्टा हिने मंगळवारी (२२ एप्रिल) लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गुड न्यूज दिली. विष्णू विशालने (Vishnu Vishal Jwala Gutta baby girl) आपल्या एक्स अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याने आपल्या नवजात मुलीच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. दुसऱ्या फोटोत त्यांचा मोठा मुलगा बहिणीला भेटायला आल्याचं दिसत आहे.
मुलीचा बाबा झाल्याचा आनंद विष्णू विशालने सर्वांबरोबर शेअर केला. “आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे… आर्यन आता मोठा भाऊ झाला आहे… आज आमच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे… या दिवशी आम्हाला देवाकडून ही भेट मिळाली आहे… तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे,” असं विष्णू विशालने पोस्टमध्ये लिहिलं.
पाहा पोस्ट

विष्णूने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर सेलिब्रिटी या जोडप्याचं अभिनंदन करत आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन असं कृती खरबंदाने या पोस्टवर लिहिलं. चाहत्यांनीही विष्णू व ज्वालाच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
विष्णू विशालचं पहिलं लग्न रजनी नटराजशी झालं होतं. २०१८ मध्ये या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विष्णू विशालने २२ एप्रिल २०२१ रोजी हैदराबादमध्ये बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी लग्न केले. ज्वालाचंही हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न चेतन आनंदशी झालं होतं. त्यांनी २००५ मध्ये लग्न केलं होतं आणि २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
ज्वालाचा पती विष्णू सध्या दिग्दर्शक रामकुमारसोबत ‘इरंदु वानम’ सिनेमात काम करत आहे. विशेष म्हणजे, रामकुमार व विष्णू विशाल यांचा हा तिसरा चित्रपट आहे. त्यांनी आधी मुंडासुपट्टी आणि रत्सासन हे दोन सुपरहिट चित्रपट केले आहेत.