Pranav Mohanlal Vismaya Mohanlal : मल्याळम सिनेसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार मोहनलाल यांची मुलं असूनही प्रणव मोहनलाल आणि विस्मया मोहनलाल नेहमीच ग्लॅमर आणि लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतरही प्रणव अत्यंत साधेपणाने जगतो. तो जग फिरणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याची बहीण विस्मया मोहनलाल हिने आपल्या भावाबरोबरच्या एका थरारक हिमालयीन ट्रॅकिंगचा किस्सा सांगितला.

प्रणवला भटकंती करायला फार आवडतं, याबद्दल सर्वांनाच माहीत आहे. पण, त्याची बहीण विस्मया मोहनलाल हिलासुद्धा प्रवासाची प्रचंड आवड आहे. तिला भावाबरोबर फिरायला जाणं खूप आवडतं. तिचं आवडतं ठिकाण म्हणजे हिमालय आहे. “आम्ही हिमालयात गेलो होतो आणि तो अनुभव खूपच सुंदर होता. ते एक वेगळंच जग आहे. मी पाहिलेल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी ते एक आहे. पण तिथे खूप थंडी असते, त्यामुळे मी तिथे कधी राहू शकेन असं मला वाटत नाही. पण तो प्रवास खरोखरच खूप छान होता,” असं तिने एका कार्यक्रमात सांगितलं.

हिमालयात ट्रिपला गेल्यावर प्रणव-विस्मयाबरोबर काय घडलं होतं?

‘वनिता’ मॅगझिनशी बोलताना प्रणवबरोबरच्या प्रवासाबद्दल विस्मया म्हणाली, “प्रणव आणि आमच्या काही चुलत-मावस भावंडांबरोबर मी हिमालयात गेले होते. ती माझ्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात सुंदर सहल होती. तिथे आम्ही एका वेगळ्याच आहोत, असं वाटत होतं.”

विस्मया म्हणाली, “आम्ही ट्रेकिंग सुरू केल्यावर एक कुत्र्याचं पिल्लू आमच्याबरोबर आलं. आम्ही सात तासांपेक्षा जास्त चाललो. यादरम्यान आम्ही रस्ता भरकटलो आणि आमचं पिण्याचं पाणीही संपलं. आम्हाला पुढचं गाव दिसल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. तोपर्यंत ते पिल्लू आमच्याबरोबरच होतं. मी अनेक देशांमध्ये फिरले असले, तरी हिमालयाची सहल ही माझी सर्वात आवडती आठवण आहे.”

प्रणव मोहनलाल नियोजनाशिवाय प्रवास करतो

“माझ्या आणि प्रणवच्या प्रवास करण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे. तो काहीच नियोजन न करता प्रवास करतो. प्रवासाला निघाल्यानंतरच तो एखाद्या ठिकाणी कसं पोहोचायचं याचा विचार करतो. तिथे पोहोचल्यावरच तो राहण्यासाठी जागा शोधतो. त्यातच खरी मजा आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण मी मात्र सर्व नियोजन केल्यावरच घराबाहेर पडते. प्रवासादरम्यान अप्पू चेट्टन अगदी साधेपणाने राहतो, तर मी माझ्या सोयीनुसार आणि कम्फर्ट झोनमध्ये राहणं पसंत करते,” असं विस्मयाने सांगितलं.

विस्मया मोहनलाल जुड अँथनी जोसेफ दिग्दर्शित ‘थुडक्कम्’ या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. मोहनलाल, आशिष जो अँटोनी, साई कुमार, बॉबी कुरियन, मनोज के. जयन, के.बी. गणेश कुमार, अश्विन, एस्सा, कोट्टायम रमेश, जया कुरुप आणि जाफर इडुककी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.