दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांना ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांनी काश्मिरी पंडितांची व्यथा या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाला देशभरातून पाठिंबा मिळाला. करोना काळ असूनही या चित्रपटाने तगडी कमाई केली. ‘काश्मीर फाईल्स’च्या प्रदर्शनानंतर विवेक अग्निहोत्री यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली.

विवेक सोशल मीडियावर फार सक्रिय आहेत. या माध्यमावर ते सतत व्यक्त होत असतात. नुकतेच त्यांनी एक ट्वीट रिशेअर करत त्यामधील मजकूरावर भाष्य केले आहे. एएनआयच्या या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी मुस्लीम समुदायाबद्दल केलेल्या विधानाची माहिती दिलेली आहे. “आजच्या काळात कला, काव्य किंवा लेखन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये योगदान देण्याची क्षमता अल्पसंख्याक समुदायाकडे आहे. बॉलिवडूमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक योगदान कोणी दिले आहे? मुस्लीम समुदायांने बॉलिवूडच्या प्रगतीसाठी सर्वात जास्त योगदान दिले असून त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही” असे शरद पवार म्हणाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

आणखी वाचा – “तिथे रात्री ३ वाजता…” रितेश देशमुखचा शाहरुख खानच्या ‘मन्नत’वरील पार्टीबद्दल खुलासा

एएनआयचे हे ट्वीट रिशेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मी जेव्हा मुंबईला आलो, तेव्हा शरद पवार इथले राजा होते. अन्य राज्यकर्त्यांप्रमाणे या राजाची पार्टीही कर गोळा करायची. बॉलिवूडचे लोक हसत-हसत त्यांना कर द्यायचे. याच्या बदल्यामध्ये त्यांना सिनेसृष्टीवर राज्य करायची मुभा मिळायची. मला हे कोण लोक आहेत हा प्रश्न नेहमी पडायचा. आज शरद पवार यांच्यामुळे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले”

आणखी वाचा – छोटा पडदा गाजवणारा हार्दिक जोशी दिसणार ऐतिहासिक चित्रपटात; ‘हर हर महादेव’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

नागपुरातील विदर्भ मुस्लीम बौद्धिक मंच यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केले. तेथे त्यांनी मुस्लीम समाजातील वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींवरही भाष्य केले.