अक्षय कुमारनंतर आता विवेक ओबेरॉय शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून आला आहे. विवेकने सीआरपीएफमधील २५ शहीद जवानांच्या कुटुंबासाठी घर देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर विवेकच्या या निर्णयाचे भरभरून कौतुक केले जात आहे.
विवेक ओबेरॉची रियल इस्टेट कंपनी ‘कर्म’कडून ही घरं देण्यात येणार आहे. ठाणे, मुंबई परिसरात ही घरं देण्यात येणार आहेत. कंपनीने सीआरपीएफला या संदर्भात एक पत्रही लिहिले आहे. ही घरं वेगवेगळ्या कार्यवायांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत.

karrm karrm2

याआधी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने जनतेला सुकमा येथे नक्षली हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना मदत करण्याचे आवाहन केले होते. २४ एप्रिलला छत्तीसगढ येथील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे २६ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याआधी याच भागात ११ मार्चला झालेल्या नक्षल हल्ल्यातही १२ जवान शहीद झाले होते. त्यावेळी अक्षयने या शहीदांच्या कुटुंबियांना एकूण १ कोटी ८ लाख रुपयांची मदत केली होती.

अक्षय कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ९ एप्रिलला ‘भारत के वीर’ या वेबसाइट आणि मोबाइल अॅपचे उदघाटन करण्यात आले होते. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करता यावी यासाठी अक्षयने गृहमंत्रालयाला वेबसाइट आणि अॅप लॉन्च करण्याची कल्पना दिली होती. त्याच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वेबसाइटच्या माध्यमातून सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या कुटुंबियांना देशातील कानाकोपऱ्यातून आर्थिक मदत केली गेली.

जवानांच्या कुटुंबियांना १२ तासांच्या आतच भरभरुन मदत मिळाली असे वृत्त या वेबसाइटने दिले होते. एएसआय नरेश कुमार यांच्या कुटुंबियांना २८ हजार ८५१ रुपये तर एएसआय संजय कुमार यांच्या कुटुंबियांना २५ हजार ८२१ रुपयांची मदत मिळाली होती. क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.